वेलिंग्टन : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टेंट बोल्ट आयपीएल स्पर्धा संपवून मायदेशी दाखल झाला आहे. पुढील महिन्यात विंडीज विरुद्ध होणाऱया कसोटी मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचे बोल्टने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
पुढील महिन्यात विंडीज आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका तसेच टी-20 सामन्यांची मालिकाही खेळविली जाणार आहे. क्रिकेटमधील कसोटी या क्रीडा प्रकारात न्यूझीलंडची निवड समिती नेहमीच बोल्टला प्राधान्य देते. पण यापुढे आपण टी-20 प्रकारातही दर्जेदार कामगिरी करू, असा विश्वास बोल्टने व्यक्त केला आहे. उभय संघातील कसोटी मालिकेपूर्वी टी-20 मालिका होणार आहे.
ख्राईस्टचर्चमध्ये जैव सुरक्षित वातावरणात बोल्टला रहावे लागणार आहे. गुरुवारी बोल्टचे न्यूझीलंडमध्ये आगमन झाले. ऑकलंडमध्ये 27 नोव्हेंबरला विंडीज आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळविला जाणार आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या सर्व खेळाडूंची किमान तीन वेळा कोरोना चाचणी घेतली जाईल, असे क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने सांगितले.