वनडे व टी-20 संघांना करणार मार्गदर्शन
वृत्तसंस्था/ सेंट जॉन्स, अँटिग्वा
भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टेव्हर पेनी यांची विंडीजने आपल्या राष्ट्रीय मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघासाठी साहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. वार्विकशायरच्या पेनी यांना क्रिकेट विंडीजने दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे.
क्रिकेट विंडीजने दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, ‘पेनी हे क्षेत्ररक्षण विभागात तज्ञ आहेत. यासाठी त्यांची विंडीजच्या वनडे व टी-20 संघांसाठी नियुक्ती केली असून या विभागात ते संघांना मार्गदर्शन करतील.’ विंडीजची मायदेशात आयर्लंडविरुद्ध मालिका होणार असून पेनी 2 जानेवारी रोजी संघात दाखल होतील व संघाची तयारी करवून घेतील. या मालिकेत 3 वनडे व 3 टी-20 सामने होणार असून त्याची सुरुवात 7 जानेवारीपासून होणार आहे.
‘पोलार्ड व फिल सिमॉन्स यांच्या नेतृत्वाखाली या संघासमवेत काम करण्याची संधी मिळणार असल्याने मी रोमांचित झालोय,’ अशा भावना पेनी यांनी व्यक्त केल्या. या संघातील अनेक सदस्यांसमवेत सुदैवाने गेल्या काही वर्षांत काम केलेले आहे तर सीपीएलमध्ये भाग घेतल्याने कॅरिबियन हे माझ्यासाठी देशाबाहेरील माहेरघर बनले आहे, असेही ते म्हणाले. ‘टी-20 च्या दोन विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. त्यापैकी एक ऑस्ट्रेलियात 2020 मध्ये आणि दुसरी 2021 मध्ये भारतात होणार आहे. या मोठय़ा स्पर्धांसाठी खेळाडूंना पूर्णपणे सज्ज करणे हा माझा उद्देश आहे. विंडीजच्या जनतेसाठी या दोन्ही स्पर्धा त्यांच्या संघाला जिंकू देण्याचा मनोदय आहे,’ असे ते म्हणाले. पेनी यांनी वार्विकशायरसाठी 158 प्रथमश्रेणी व 291 लिस्ट ए सामने खेळले आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय संघांसमवेत काम करण्याचा अनुभव आहे. त्यात भारत, लंका, नेदरलँड्स, अमेरिका यांचा समावेश आहे. याशिवाय आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब, डेक्कन चार्जर्स, कोलकाता नाईट रायडर्स तसेच विंडीजच्या सीपीएलमध्ये सेंट लुसिया झोयुक्स, सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स या संघांना साहाय्यक प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले आहे. या वर्षीच्या सीपीएलमध्ये बार्बाडोस ट्रायडंटच्या प्रशिक्षण स्टाफमध्ये ते होते आणि या संघाने जेतेपदही पटकावले आहे.