प्रतिनिधी / सातारा
वाहतूक शाखेच्या क्रेनची दहशत शहरात सर्वांनाच असते. मात्र, तीच वाहतूक शाखेची क्रेन सातारा तहसील कार्यालयात येरझाऱ्या मारते आणि कामासाठी आलेल्या आणि काम न झाल्याने वैतागलेल्या नागरिकांच्या गाड्या उचलून घेवून जाते. त्यातूनच सोमवारी जो वाद उद्भभवला त्याचे पडसाद सोशल मिडियावर चांगलेच उमटले आहेत. अगोदर पार्किंग व्यवस्था द्या आणि तहसील कार्यालयात वाहतूक शाखेच्या क्रेनची गरजच काय ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
तहसील कार्यालयात प्रचंड संख्येने नागरिक येतात मात्र इंग्रजांच्या काळातील इमारतीत वसलेले तहसील व प्रांत कार्यालय अद्यापही त्याच काळात आहे. सातारा जिल्ह्याचे ठिकाण असून ही दोन्ही कार्यालये प्रशस्त जागेत न्यावीत असे प्रशासनालाही वाटत नाही आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कोरोना काळात तर आत येण्यासच मनाई करण्यात आली होती. वाहने तर दूरची गोष्ट झाली. त्यानंतर शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरु केली तरी तहसील कार्यालयात वाहनांना बंदीच करण्यात आली होती. त्यासाठी एक शिपाई राखण ठेवला होता. मात्र, त्यावेळी देखील अशीच वादावादी झाली आणि तहसीलदारांच्या आदेशाने काम करणाऱ्या शिपायाला मार खावा लागला.
ग्रेड सेपरेटरच्या तोंडावर तहसील कार्यालयाचे प्रवेश द्वार आल्याने तशी अडचण वाढलेलीच आहे. आतील परिसरात पार्किंगची बोंब ही खूप वर्षांपासून आहे. त्यातच जप्त केलेली मोठी वाहने कार्यालयाच्या परिसरात लावल्यानंतर नागरिकांनी वाहने कोठे पार्क करायाची याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वर्षांपासून येणारे तहसीलदार, प्रांताधिकारी नागरिकांना होणाऱ्या गैरसुविधांकडे लक्ष देत नाहीत. त्यातूनच तहसील कार्यालय परिसर सध्या हॉटस्पॉट ठरलाय.
मूलभूत सुविधांची वाणवा
तहसील, प्रांत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्क करण्यास जागा नसते. दुय्यम निबंधक कार्यालयात चारचाकी वाहनांशिवाय कोणी येत नाही. मोठी वाहने, दुचाकी यांना पार्किंग नसल्याने मग गोंधळ होतो. नागरिक वाहन पार्क करुन तिथे मजा करायला आलेले नसतात. काम लवकर झाले की त्यांनाही जायचे असते. फक्त पार्किंगच नव्हे तर या कार्यालयात स्वच्छतागृहांची प्रचंड दुरावस्था झाली असून याबाबत अनेक वेळा आवाज उठून देखील प्रशासन ढिम्म आहे.
वाहतूक शाखेच्या क्रेनला कशाला बोलावता
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी. पार्किंगला शिस्त यावी यासाठी वाहतूक शाखेने क्रेनचा उपक्रम राबवलाय. शहरात रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे. मात्र, तहसील कार्यालयात रस्त्यावरची वाहतूक नसते. तिथे पार्किंग व्यवस्था निर्माण केली पाहिजे. तहसील व प्रांत मात्र वाहतूक शाखेच्या क्रेनला बोलावून वाहने उचलण्यास सांगतात यालाच नागरिकांचा आक्षेप आहे.
शहरात पार्किंग व्यवस्था द्या
तहसील, प्रांत कार्यालयाच नव्हे तर शहरातील सर्वच ठिकाणी नागरिकांना पार्किंगची व्यवस्था करुन देण्याची जबाबदारी सातारा नगरपालिकेची आहे. शहरातील अनेक इमारतींचे पार्किंगचे तळमजले व्यावसायिक कारणासाठी वापरलेत. रस्त्यावर वाहने येणारच. बाजारपेठेत वाहने येणारच. या सर्वांना पार्किंगची सुविधा निर्माण करुन द्या म्हणून सातारकर अनेक वर्षांपासून टाहो फोडत आहेत. मात्र, पालिका प्रशासन देखील ढिम्मच आहे.