ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात तणावाचे वातावरण असतानाच आता ट्विटरने नवा वाद ओढवून घेतला आहे. ट्विटरच्या वेबसाइटवर असलेल्या भारताच्या नकाशात छेडछाड करण्यात आली आहे. ट्विटरने आपल्या वेबसाईटवर जम्मू-काश्मीर आणि लडाखला स्वतंत्र देश म्हणून दाखवले आहे.
ट्विटरच्या करिअर पेजवर ट्विट लाईफ विभागात जागतिक नकाशा आहे. येथून कंपनीची ट्विटर टीम जगात कुठे आहे हे दर्शवते. या नकाशात भारत देखील आहे. परंतु भारताचा नकाशा वादग्रस्त असल्याचे दर्शविले आहे. याआधीही लडाखला भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आले नव्हते. मात्र, नंतर ते दुरुस्त करण्यात आले होते.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरकडून करण्यात आलेल्या नकाशाच्या छेडछाडीप्रकरणी केंद्र सरकार माहिती गोळा करत आहे. नकाशात केव्हा बदल करण्यात आला, तो नकाशा वेबसाईटवर केव्हा अपलोड करण्यात आला आणि नकाशातील बदलामागे काय हेतू आहे. तसेच हे करणारे लोक नेमके कोण आहेत, हे शोधून सरकार त्यावर कठोर कारवाई करणार आहे.