काँग्रेस नेत्याचा ट्विट हटविला- बलात्कार पीडितेच्या पालकांचे छायाचित्र केले होते शेअर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बलात्कार आणि हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची ओळख जाहीर करणाऱया काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटला हटविण्यात आले आहे. या ट्विटमध्ये राहुल यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या भेटीचे छायाचित्र शेअर केले होते. ही कृती नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) या ट्विटवरून दिल्ली पोलीस आणि ट्विटरकडे तक्रार केली होती. एनसीपीसीआरने पीडितेच्या कुटुंबीयांचे छायाचित्र पोस्ट करण्यासाठी राहुल यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. राहुल यांनी ज्युवेनाइल जस्टिस ऍक्ट आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स (पॉस्को) ऍक्टचे उल्लंघन असल्याचे आयोगाने म्हटले होते.राहुल गांधी यांनी बुधवारी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी राजकारण तापले आहे.
दिल्ली कँटच्या ओल्ड नांगल गावात बलात्काराची घटना घडली होती. तेथील स्मशानभूमीतील वॉटर कूलरमधून पाणी घेण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी स्मशानभूमीतील मंदिराच्या पुजाऱयासह 4 जण आरोपी आहेत. आरोपींनी कुटुंबीयांची मंजुरी न घेताच मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले होते. वॉटर कूलरमधून पाणी भरताना वीजेचा धक्का लागल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे पुजारी आणि त्याच्या काही सहकाऱयांनी मुलीच्या कुटुंबीयांना सांगितले होते.