दीड वर्षांनंतर हटली बंदी
अभिनेत्री कंगना रनौत ट्विटरवर परतली आहे. कंगनाचे ट्विटर अकौंट 2021 मध्ये निलंबित करण्यात आले होते, परंतु आता तिचे अकौंट पुन्हा सुरू करण्यात आले आहे. कंगनाने स्वतः ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. या प्लॅटफॉर्मवर पुन्हा परतल्यावर चांगले वाटत असल्याचे कंगनाने म्हटले आहे.
तसेच दुसऱया एका ट्विटमध्ये तिने स्वतःचा चित्रपट ‘इमरजेंसी’चे चित्रिकरण पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. मे 2021 मध्ये ट्विटर धोरणाच्या उल्लंघनाप्रकरणी कंगनाचे अकौंट निलंबित करण्यात आले होते. कंगनाने त्यावेळी ट्विटरवर जोरदार टीका केली होती. तसेच ट्विटरवर देशात बंदी घालण्याची मागणी तिने केली होती.
कंगनाचा इमरजेंसी हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आणीबाणीचा कालखंड दर्शविला जाणार आहे. तसेच यात अनेक दिग्गज कलाकार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. तर कंगना ट्विटरवर परतल्याने तिचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. कंगनाने काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांच्या नव्या सब्सक्रिप्शन पॉलिसीला पाठिंबा दर्शविला होता. कंगनाने अलिकडेच ट्विटर आपल्याला अधिक पसंत असल्याचे नमूद केले होते.