400 मीटर्स फ्री स्टाईलमध्ये सर्वोच्च पदकावर कब्जा
400 मीटर्स फ्री स्टाईलसाठी फायनलमधील शेवटचे 8 स्पर्धक आपल्या लाईनवर सज्ज झाले, त्यावेळी टय़ुनिशियाच्या अहमद हफनाओईकडे कोणाचेच लक्ष नव्हते. पण, प्रत्यक्ष शर्यत सुरु झाल्यानंतर याच अहमदने आपल्यापेक्षा अधिक वेगवान आणि अधिक अनुभवी जलतरणपटूंवर मात करत आश्चर्यकारक सुवर्णपदकाची कमाई केली.
18 वर्षीय अहमदने 3 मिनिटे 43.26 सेकंद वेळेत हा इव्हेंट पूर्ण केला. 15 हजार प्रेक्षक क्षमतेच्या या एरेनावर काही मोजक्याच पदाधिकारी व स्वयंसेवकांचा समावेश होता. ‘मी ज्यावेळी फिनिशिंग लाईनला स्पर्श केला, त्यावेळी मला जाणवले की, आपणच सर्वप्रथम पोहोचलो आहे आणि हे माझ्यासाठीच आश्चर्याचे होते’, असे अहमद हफनाओईने येथे सांगितले. ‘पाण्यात उडी घेतली त्यावेळी मी पदकाचा नव्हे तर टायमिंगचा विचार करत होतो, याचाही त्याने येथे उल्लेख केला.
ऑस्ट्रेलियाचा जॅक मॅकलॉघ्लिनने रौप्य तर अमेरिकेच्या केरॅन स्मिथने कांस्य पदक जिंकले. या पहिल्या तीन स्पर्धकांमध्ये 8 लॅपच्या रेसमध्ये एका सेकंदापेक्षाही कमी अंतर राहिले.
आश्चर्याची बाब म्हणजे अहमद हा फायनलसाठी पात्रता संपादन करणारा आठवा व शेवटचा स्पर्धक होता आणि अगदी अंतिम क्षणी त्याने यात यश मिळवले होते.
या इव्हेंटमध्ये रौप्य जिंकणाऱया स्मिथने तर या स्पर्धेपूर्वी अहमदबद्दल आपण काहीच ऐकले नव्हते, असे सांगितले. अहमद आता टय़ुनिशियातर्फे जलतरणात सुवर्ण जिंकणारा केवळ दुसराच जलतरणपटू ठरला आहे. यापूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ऑस मेल्लोलीने 1500 मीटर्स फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण जिंकले होते. ऑसच्या खात्यावर एकूण 3 ऑलिम्पिक पदके आहेत. टोकियोतील इव्हेंटपूर्वी ऑसने अहमदला शुभेच्छा दिल्या. त्या फळल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले.
अहमदने वयाच्या 6 व्या वर्षापासून जलतरणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याला स्विम क्लबमध्ये समाविष्ट केले. अहमदला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसा अनुभव नाही. 2018 युवा ऑलिम्पिक्समध्ये आठवे स्थान मिळवले, हीच त्याची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी होती. मात्र, आता थेट ऑलिम्पिक सुवर्ण जिंकत त्याने आश्चर्याचा धक्का दिला. अहमदकडे आता गुरुवारी 800 मीटर्स फ्री स्टाईलमध्ये देखील आणखी एक संधी असणार आहे. पुढील वर्षी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याचा त्याचा विचार आहे.