मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्रातील जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोफत लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. तशी मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. अखेर आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दलचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 18 ते 45 वर्ष वयोगटात असलेल्या 5 कोटी 71 लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारणत: लसींचे 12 कोटी डोस लागतील. यामुळे राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडेल.
याआधीच 45 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण केलं जात होतं. दरम्यान, राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे लसींच्या खरेदीसाठी राज्य सरकार तयार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या 1 मे पासून राज्यात होणाऱ्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण मोफत करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
साधारणपणे आपण 6 महिन्यांत हा लसीकरणाचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. त्यासाठी 12 कोटी डोस लागतील. त्यानुसार महिन्याला 2 कोटी डोस द्यावे लागतील. ही राज्य शासनाची क्षमता आहे. 13 हजार संस्था आरोग्य विभागाच्या आहेत. त्यामुळे राज्यात रोज १३ लाख लसीकरण करता येऊ शकेल. महाराष्ट्र देशात सर्वात कमी लसी वाया जाण्याचं प्रमाण आहे. सध्या राज्यात १ टक्के लसी वाया जाण्याचं प्रमाण असून देशातल्या 6 टक्के या प्रमाणापेक्षा ते कमी आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.