ऑनलाईन टीम / मुंबई :
कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी आज आणखी एक खुलासा केला आहे. कॉर्डेलिया क्रूझवर पार्टीचं आयोजन करणारा ड्रग्ज पेडलर काशिफ खान यानं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील या पार्टीचे निमंत्रण दिलं होतं. शेख यांनी पार्टीत सहभागी व्हावं, यासाठी तो सतत आग्रह करत होता, असे मलिक यांनी म्हटले आहे.
मलिक म्हणाले, ड्रग्ज पार्टी हा प्रचंड मोठा कट होता. मोठय़ा घरातील मुलांना यात अडकवून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंच्या खासगी आर्मीला वसुली करायची होती. तसेच ही पार्टी ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे दाखविण्याचा त्यांचा कट होता. त्यासाठीच ड्रग्ज पेडलर काशिफ खान याने मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना या पार्टीचे निमंत्रण दिले होते. तसेच तो शेख यांना पार्टीत सहभागी होण्यासाठी सतत आग्रह करत होता. अस्लम शेख यांना काशिफ खान तिथं का बोलवत होता? कारण ड्रग्जचा हा खेळ राज्य सरकार चालवतंय असंच त्यांना दाखवायचं होतं असा संशयही मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.