ऑनलाईन टीम / नवी मुंबई
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यात एका संशयित दहशतवाद्याला अटक केलं असून मुंबईतील नियोजित कटासंदर्भात सहभागी असल्याच्या संशयास्पद हालचालीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात केली असून रिझवान नावाच्या संशयित दहशतवाद्याला या कारवाईत पकडलं आहे. त्याला मुंबईच्या हॉलिडे कोर्टात हजर केलं असता कोर्टाने २० सप्टेंबर पोलीस कोठडी सुनावली आहे. एटीएसच्या म्हणण्यानुसार, झाकीर हुसेन शेखच्या चौकशीदरम्यान रिझवानचं नाव समोर आलं होतं. झाकीर हुसेन शेखला महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पकडलं होतं. त्याला देखील दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या दहशतवादी कटासंदर्भात सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र एटीएसच्या म्हणण्यानुसार शेख या दहशतवादी आरोपीचे दहशतवादी कटाशी संबंध होते. तसेच शेखने दहशतवादी जान मोहम्मद उर्फ समीर कालियाला मुंबईत शस्त्रं आणि स्फोटकं आणण्यास सांगितलं होतं. यावर पुन्हा एटीस पथक सखोलपणे चौकशी करत आहे. तसेच यापुर्वी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांशी नेमके काय कनेक्शन होते हे ही यामुळे समोर येण्याची शक्यता आहे.