चौकाचौकात उभ्या राहू लागल्या नरकासूर प्रतिमा
प्रतिनिधी /पणजी
दीपावलीचा सण आता अवघ्या 13 दिवसांवर येऊन ठेपला असून जनतेला दिवाळीची प्रतीक्षा लागली आहे. बाजारात रंगीबेरंगी आकाशकंदील झळकू लागले आहेत. त्याचबरोबर विविध चौकाचौकात नरकासूर प्रतिमा उभे करणे सुरू झाले आहे.
आनंदाचा सण म्हणजे दिवाळी. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अडचणीत आलेल्या गोमंतकीय जनतेला यावर्षी उत्साहात दिवाळी सण साजरा करण्याची संधी मिळणार आहे. कोरोनाचा प्रभाव ओसरल्याने राज्यात यंदा दिवाळी उत्सवाची धमाल पहायला मिळणार आहे. अनेक संस्था व संघटनांनी दिवाळी उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे. राज्यात दोन वर्षानंतर प्रथमच विविध ठिकाणी दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दि. 3 नोव्हेंबर रोजी नरकासूर प्रतिमा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्याचे ठरविले आहे.
राजधानी पणजीसह फोंडा, म्हापसा, मडगाव, सांगे, केपे, कुडचडे, वास्को, पेडणे तसेच कळंगूट आदी महत्त्वाच्या शहरांमध्ये यावर्षी नरकासूर प्रतिमा स्पर्धा तसेच आकाशकंदील स्पर्धाही आयोजित केल्या जाणार आहेत. यावर्षी निवडणुकीनिमित्त कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पसरलेला आहे. अनेक स्थानिक नेत्यांनी नरकासूर प्रतिमा तयार करणाऱया पथकांना आर्थिक हातभार लावून मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. सध्या रात्री उशिरापर्यंत नरकासूर प्रतिमा बनविण्याचे काम हाती घेण्यात येते.
बाजारात दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. व्यापारी मंडळींनी रंगीबेरंगी आकाशकंदील विक्रीसाठी ठेवलेले आहेत. दिवाळीनिमित्त बाजारात विविध वस्तू विक्रीस उपलब्ध झालेल्या आहेत. तथापि यावर्षी सुका मेव्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे.