बागायत खात्यामार्फत मिळतेय अनुदान, फळ-फूल, भाजीपाला उत्पादकांना उपयुक्त, प्रशिक्षणाची सोय
सुनील राजगोळकर /बेळगाव
फळ-फूल आणि भाजीपाला उत्पादकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी बागायत खात्यामार्फत ठिबक सिंचनसाठी अनुदान उपलब्ध होत आहे. अलिकडे या अनुदानाचा लाभ घेऊन फळ-फूल आणि भाजीपाला पिकविणाऱया उत्पादकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ठिबक सिंचनवर फळ-फूल आणि भाजीपाला बहरताना दिसत आहे.
बागायत खात्यामार्फत अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱयांना 90 टक्के तर इतर लहान शेतकऱयांना 40 टक्के अनुदान उपलब्ध होत आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन काढण्यासाठी ठिबक सिंचन लाभदायक ठरत आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी संबंधित उत्पादकांनी जवळच्या रयत संपर्क केंद्र किंवा तालुका बागायत खात्याच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन खात्याने केले आहे.
अलिकडे बागायत शेतकऱयांच्या संख्येत वाढ झाली असून तब्बल 2 लाखांहून अधिक शेतकरी विविध जातीची फळे-फूले आणि भाजीपाला पिकविताना दिसत आहेत. चिंच, आंबा, काजू, मका, जांभूळ, लिंबू, पेरू, द्राक्षे, सीताफळ, शेवगा, कडीपत्ता, मिरची, फ्लावर, कोबी, दोडकी, बिन्स, गवार, कोथिंबीर, गाजर, यासह गुलाब, मोगरा, सूर्यफूल आदींच्या उत्पादनासाठी ठिबक सिंचन महत्त्वाचे ठरत आहे.
कमी पाण्यात कमी खर्चात अधिक उत्पादन काढण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत उपयुक्त ठरत आहे. खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामातील भाजीपाला उत्पादनासाठी स्थानिक शेतकऱयांकडून याचा वापर अधिक होत आहे. बागायत क्षेत्र वाढविण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू असून इतर पिकाऊ शेतीला फळ-फुलांची शेती एकरूप करण्यासाठी अनुदान महत्त्वाचे आहे. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्याबरोबर अनुदानासाठी शेतकऱयांनी पुढे यावे, असे आवाहन खात्याने केले आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱयांनी शेतीचा उतारा, आधारकार्ड, जॉबकार्ड, दोन फोटो, बँक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
ठिबक सिंचनचे महत्त्व
ठिबक सिंचनद्वारे 40 ते 50 टक्के पाण्याची बचत होऊन दुप्पट पिकाऊ क्षेत्र पाण्याखाली येत आहे. वेळेवर आणि योग्य पाणी मिळाल्याने उत्पादनात 20 ते 30 टक्के वाढ होते. शिवाय खताची मुबलक मात्रा उपलब्ध होऊन पीक जोमात येते. त्यामुळे अलिकडे ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून उत्पादन वाढविणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. बागायत खात्यामार्फत उत्पादन वाढीसाठी मातीचे परिक्षण करून शेतकऱयांना मार्गदर्शन केले जात आहे. शिवाय स्थानिक वातावरणात जोमाने येणाऱया पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या माध्यमातून शेतकऱयांना फळ-फुलझाडे, भाजीपाला, मसाले, सुगंधित व सजावटीची झाडे फुलविण्याची संधी मिळणार आहे.
उत्पादकांनी लाभ घ्यावा
खात्यामार्फत विविध योजना राबवून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. विविध रोपांच्या लागवडीसाठी देखील अनुदान दिले जात आहे. त्याबरोबर फळ-फूल आणि भाजीपाला उत्पादकांसाठी ठिबक सिंचनसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. याकरिता प्रशिक्षण देखील दिले जात असून उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा.
– रविंद्र हाकाटी (उपनिर्देशक बागायत खाते, बेळगाव)
30 गुंठय़ात गुलाब लागवड
ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून 30 गुंठय़ात गुलाब फुलाची लागवड केली आहे. यामुळे पाण्याची आणि पैशांची बचत झाली आहे. जमिनीतील सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत उपयोगी पडते. बागायत खात्याच्या अनुदानांतर्गत ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. त्यामुळे मंजूर आणि वेळेची बचत होत आहे. त्यामुळे ठिबक सिंचन पद्धत फायदेशीर आहे.
– हरीष गोपाळ टोपकार (फूल उत्पादक शेतकरी-नंदिहळ्ळी)