तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून सर्वत्र लॅाकडाऊन असल्यामुळे शहरातील अनेक छोटेमोठे दुकानदारांवर, हातावरचे पोट असणारे किरकोळ दुकानदार आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. अशा परिस्थितीत ठोक विक्रेता मात्र साठेबाजी करुन किरकोळ विक्रेत्यांच्या नफ्यातील मार्जिन कमी करुन चढ्यादराने माल विक्री करत असून किरकोळ विक्रत्यांच्या नफ्यावर डल्ला मारत असल्याचे पहावयास मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॅाकडाऊन सर्वत्र सुरु असल्यामुळे ठोक विक्रेते मालांची मोठ्या प्रमाणात साठेबाजी करुन चढ्या दराने मालाची विक्री करत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.
ठोक विक्रेत्याला किरकोळ विक्रीची सुद्धा परवानगी असल्याने अनेक ठोक विक्रेत्यांची स्वतःची रिटेलची सुद्धा दुकाने आहेत. जेंव्हा किरकोळ व छोटेमोठे दुकानदार एखाद्या मोठ्या ठोक विक्रेत्याकडे मालासाठी जातात तेंव्हा हा ठोक विक्रेता साठबाजी करुन आपला ठोक विक्रीचा माल स्वतःच्याच रिटेल दुकानात घेऊन तोच माल इतर छोट्या मोठ्या दुकानदारांना विकताना ठोक विक्रीच्या दरात न देता तो रिटेल काऊंटरवर घेऊन त्यामध्येही रिटेलमधील अडीच ते तीन टक्के जादा नफा काढून विकत आहे. त्यामुळे सामन्य किरकोळ विक्रत्यांना कमी नफा मिळत असून आर्थिक फटका बसत आहे. ठोक विक्रत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांची ही पिळवणूक होत असल्याचे किरकोळ दुकानदारांतून बोलले जात आहेत.