शिराळा / वार्ताहर
शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिरा समोरील बायपास रोड फाट्यावर भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकी मोपेडला धडक दिल्याने निवृत्त शिक्षक विलास वसंतराव कुलकर्णी ( वय ७०, रा. पूल गल्ली, शिराळा ) हे जाग्यावरच ठार झाले. सदर घटना आज बुधवार दि.२९ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर डंपर चालक पळून गेला.
याबाबतची माहिती अशी की डंपर (क्रमांक एम एच १० ए डब्ल्यू ७७७५ ) हा मालवाहू डंपर भरधाव वेगाने बिऊर कडून पेठ नाक्याच्या दिशेने निघाला होता तर मोपेड ( क्रमांक एम एच १० बी बी ०७९४ ) वरून विलास कुलकर्णी हे शिराळा हून मांगलेच्या दिशेने निघाले होते. गोरक्षनाथ मंदिरा समोरील बाह्य वळण रस्त्यावरील चौकात या दोन वाहनांच्या मध्ये धडक झाली. मोपेड गाडी डंपर च्या चाकाखाली गेल्याने त्याचा चक्काचूर झाला तर निवृत्त शिक्षक विलास कुलकर्णी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक अपघातानंतर पळून गेला. या घटनेची प्रशांत हसबनिस यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार हे करत आहेत.