नगरपंचायत सत्ताधाऱयांकडून जनतेच्या पैशाचा दुरूपयोग
शिवसेना तालुका व शहरप्रमुखांचा आरोप
प्रतिनिधी / देवगड:
देवगड जामसंडे नगरपंचायतीने टेंबवली येथे डंपिंग ग्राऊंडसाठी 35 गुंठे जागा घेऊन दोन वर्षे होऊनही या जागेत एकदाही कचरा टाकलेला नाही. तर देवगड-जामसंडे परिसरातच उघडय़ावर कचरा टाकण्याचे काम नगरपंचायतीच्यावतीने करण्यात येत आहे. डंपिंग ग्राऊंडसाठी सुमारे 28 लाख रुपये खर्च करून जनतेच्या पैशाचा सत्ताधाऱयांकडून दुरुपयोग करीत असल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर व शहरप्रमुख संतोष तारी यांनी केला आहे.
ओला व सुका कचरा संकलन करण्याचे काम नगरपंचायत स्थापनेपासून देवगड जामसंडे परिसरात करण्यात येत आहे. यात शेकडो टन ओला व सुका कचरा गोळा केला जातो. या कचऱयाची विल्हेवाट यापूर्वी वेगवेगळय़ा ठिकाणी केली जात होती. याप्रसंगी देवगड पवनचक्की समुद्रकिनारी हा कचरा डपिंग केला जातो. ही बाब निदर्शनास येताच शिवसेना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविला. त्यानंतर टाकण्यात आलेला कचरा तेथून उचलून अन्यत्र हलविला, असे असले तरी अन्य काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात कचरा विल्हेवाट केली जाते. ही बाब नागरिकांच्या तक्रारीवरून निदर्शनास आली. त्यानुसार शिवसेना नेते सतीश सावंत व जिल्हाप्रमुख संजय पडते आदी पदाधिकाऱयांनी देवगड सडा नेने नगर येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीखाली राबविण्यात येणारा गांडूळ खत प्रकल्प व नजिक डंपिंग केलेला कचरा तात्काळ हटवावा अन्यथा आदोलन केले जाईल, असा इशारा दिला होता.
तद्नंतर नगरपंचायत प्रशासनामार्फत याची दखल घेऊन गांडूळखत प्रकल्प नजीकचा डंपिंग केलेला कचरा तेथून उचलण्यात आला. त्याबद्दल नगरपंचायत प्रशासनाला धन्यवाद देत आहोत. परंतु शिवसेना आंदोलनानंतर नगराध्यक्षा सौ. प्रणाली माने यांनी माध्यमांशी बोलताना देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील ओला व सुका कचरा डंपिंगसाठी स्वतंत्र जागा घेण्यात आली असून त्या जागेच्या तांत्रिक बाबी पूर्ण होताच ते डंपिग ग्राऊंड कार्यरत करण्यात येईल, अशी माहिती दिली. या डंपिंग ग्राउंडच्या जागेबाबत उपलब्ध माहितीनुसार हे डंपिंग ग्राऊंड टेंबवली गाव सर्व्हे नं. 56, हिस्सा नं. 21 मधील 35 गुंठे जमीन देवगड जामसंडे नगरपचायतीने 23 फेब्रुवारी 2018 रोजी 28 लाख रुपयांना खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे
प्रशासनाच्या पैशाचा दुरुपयोग!
जागा खरेदीच्या दोन वर्षाच्या कालावधीत या जागेवर कोणत्याही प्रकारचे डंपिंग करण्यात आलेले नाही. दरम्यानच्या काळात ठिकठिकाणी नगरपंचायतीने संकलीत केलेला ओला व सुका कचरा तात्पुरत्या स्वरुपात टाकला व स्थानिकांचा विरोध झाल्यानंतर डंपिंग ग्राऊंडसाठी जागा घेतल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी नागरिकांचा 28 लाख एवढय़ा रकमेचे विनीमय दोन वर्षापूर्वी जमीन खरेदीसाठी केला गेला. परंतु तद्नंत दोन वर्षाच्या काळात त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कचरा प्रकल्प उपक्रम राबविलेला नाही. याचाच अर्थ नगरपंचायत प्रशासनाच्या पैशाचा दुरुपयोग नगरपंचायत सत्ताधाऱयांकडून करण्यात आल्याचा आरोप साळसकर व तारी यांनी केला आहे.