चीनच्या अरेरावीचे आणखी एक उदाहरण जगाने अनुभवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तपास पथकाला प्रवेश करण्याची अनुमती चीनने नाकारली आहे. डब्ल्यूएचओचे पथक चीनमध्ये कोरोना विषाणूशी संबंधित तपासासाठी प्रवेशाची अनुमती मागत होते. कोरोना विषाणूसंबंधी माहिती लपविल्याचा आरोप चीनवर केला जात आहे.
डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस निराश
कोरोना विषाणूचे संक्रमण आपल्या येथून जगभरात फैलावला नसल्याचा दावा चीन करत आहे. चीनच्या अधिकाऱयांनी तज्ञांच्या पथकाला अनुमती नाकारलयाने आपण निराश झालो आहोत. कोरोना विषाणू प्रकोप फैलावल्याच्या एक वर्षाने डब्ल्यूएचओच्या तज्ञांचे पथक चीन येथे जाऊन महामारीच्या स्रोतांचा शोध घेणार होते. या दौऱयावर जगभराची नजर होती, असे उद्गार डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेबेयेसस यांनी काढले आहेत.
चीनने कोरोना विषाणूचा फैलाव प्रारंभीच्या काळात लपवून ठेवत जगाला धोक्यात टाकल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक देशांच्या नेत्यांनी केला आहे. चीनने 10 तज्ञांच्या पथकाला यापूर्वी अनुमती दिली होती. पण नेहमीप्रमाणे सत्य लपवून ठेवण्याकरता चीनने घुमजाव करत दौऱयाला परवानगी नाकारली आहे.