जीनिव्हा / वृत्तसंस्था
लस वितरण मोहिमेंतर्गत 60 पेक्षा अधिक देशांमध्ये लस पोहचवण्याचे भारताने निश्चित केले आहे. भारत सरकारने नेपाळ, बांगलादेश, भूतान आणि इतर शेजारी देशच नाही तर पश्चिम आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांनाही लस पाठविली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छोटय़ा देशांना मदत करण्यासाठी आणि लस समानतेला समर्थन देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक टेड्रॉस अधानॉम घेबेरियसस यांनी आभार मानले. तसेच इतर देशांनीही भारताच्या सकारात्मक मार्गाचे अनुसरण केले पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड -19 या जागतिक महामारीवर मात करण्यासाठी पावले उचलली आहेत. या अंतर्गत छोटय़ा देशांना मदत करण्याच्या प्रतिज्ञेचा एक भाग म्हणून ‘लस मैत्री’ उपक्रमांतर्गत इतर देशांना विनाशुल्क लस पुरवण्यास सुरूवात केली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या ट्विटर संदेशात भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लस समानतेला पाठिंबा दर्शविल्याबद्दल आभार मानण्यात आले आहेत.
विविध देशांना आतापर्यंत भारताने लसीचे 361 लाखांहून अधिक डोस पाठविल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. त्यापैकी 67.50 लाख डोस अनुदान सहाय्य म्हणून तर 294.44 लाख डोस व्यावसायिक तत्वावर ग्राहकांना देण्यात आले आहेत. येत्या आठवडय़ात आणि काही महिन्यांत देशांना लसींचा पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू राहील. परंतु राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी देशांतर्गत गरजा लक्षात घेणे महत्वाचे आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले.