न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांची घोषणा, 15 सदस्यीय संघ जाहीर
साऊदम्प्टन / वृत्तसंस्था
भारताविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल लढतीसाठी केन विल्यम्सन पूर्ण तंदुरुस्त असून तोच संघाचे नेतृत्व भूषवेल, अशी घोषणा न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी केली. दोन्ही संघात शुक्रवार दि. 18 पासून येथील एजिस बॉल स्टेडियमवर ही निर्णायक लढत खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांनी या लढतीसाठी मंगळवारी आपले 15 सदस्यीय संघ जाहीर केले आहेत.
विल्यम्सनला यापूर्वी इंग्लंडविरुद्ध दुसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात ढोपराच्या दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. त्याच्याऐवजी टॉम लॅथमने कर्णधारपद सांभाळताना न्यूझीलंडला 8 गडी राखून दमदार विजय मिळवून दिला. मात्र, आता विल्यम्सन तंदुरुस्त झाल्यानंतर तोच संघाचा कर्णधार असेल, हे स्टीड यांनी स्पष्ट केले. पाठीच्या दुखापतीमुळे दुसरी कसोटी खेळू न शकलेल्या यष्टीरक्षक बीजे वॅटलिंगचा देखील किवीज संघात समावेश आहे.
‘केन विल्यम्सन व बीजे वॅटलिंग यांना मागील आठवडय़ात पुरेशी विश्रांती मिळाल्यामुळे वेळीच तंदुरुस्त होता आले. ते अंतिम लढतीसाठी मॅच फिट आहेत’, असे स्टीड यावेळी म्हणाले. ‘आमच्या संघाने इंग्लंडला धूळ चारली असली तरी भारतीय संघ देखील अव्वल दर्जाचा आहे आणि आम्हाला काहीही गृहित धरुन चालणार नाही’, याचा त्यांनी येथे उल्लेख केला.
न्यूझीलंडचा संघ या लढतीत अजाझ पटेल हा स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज खेळवण्याची शक्यता असून अष्टपैलू कॉलिन डे ग्रँडहोमकडून त्यांना बऱयाच अपेक्षा आहेत. न्यूझीलंडने या अंतिम लढतीसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर करताना डग ब्रेसवेल, जेकब डफी, डॅरेल मिशेल, रचिन रविंद्र व मिशेल सॅन्टनर यांना वगळले आहे.
न्यूझीलंडचा 15 सदस्यीय संघ ः केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनव्हे, कॉलिन डे ग्रँडहोम, मॅट हेन्री, काईल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजे वॅटलिंग, विल यंग.
भारताची शार्दुलऐवजी उमेश यादवला पसंती, मयांक, वॉशिंग्टनला वगळले!
न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी फायनलसाठी भारतीय संघव्यवस्थापनाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून यात ब्रिस्बेन कसोटीतील हिरो शार्दुल ठाकुरऐवजी अनुभवी स्पीडस्टार उमेश यादवला पसंती दिली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱयादरम्यान दुखापतग्रस्त असलेल्या उमेश यादवसह मोहम्मद शमी व हनुमा विहारी यांचा या 15 सदस्यीय संघात समावेश आहे.
शार्दुलबरोबरच मयांक अगरवाल, वॉशिंग्टन सुंदर यांनाही 15 सदस्यीय संघातून वगळले गेले आहे. इंग्लंड सिरीजमधील हिरो अक्षर पटेलचा देखील यात समावेश नाही.
अनुभवी फलंदाज केएल राहुल देखील समाविष्ट नाही, हा आणखी एक धक्का आहे. वास्तविक, इंटर-स्क्वॉड सराव सामना झाला त्यावेळी विराटविरुद्ध संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे होते. केएल राहुल त्या लढतीत उत्तम बहरात दिसून आला. पण, केवळ प्रथम पसंतीच्या खेळाडूंना या संघात समाविष्ट केले गेले असल्याचे निवडीवरुन दिसून आले.
शार्दुल ठाकुरने ऑस्ट्रेलिया दौऱयात अर्धशतक झळकावले. शिवाय, 7 बळी देखील घेतले होते. पण, येथे त्याला निवडले गेले नाही. रविचंद्रन अश्विन एकमेव ऑफस्पिनर असून रविंद्र जडेजा परतल्याने अक्षर पटेलला संधी मिळणार नाही, हे स्पष्ट होते. पर्यायी यष्टीरक्षक असावा, या धोरणामुळे साहाची जागा अबाधित राहिली असल्याचे चित्र आहे.
भारताचा 15 सदस्यीय संघ ः विराट कोहली (कर्णधार), शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), उमेश यादव, हनुमा विहारी.