कर्जात बुडालेल्या कुटुंबाला भावाबहिणीने सावरले
माणूस जितका गरीबीकडून शिकतो, तितका त्याला कुठलाच क्षण किंवा अन्य कुणी शिकवू शकत नाही. पण खडतर काळ काही सदैव राहत नाही. माणूस मेहनतीने स्वतःची स्थिती बदलू पाहतो. सनातन आणि सावित्री हे दोघेही भाऊबहिण आहेत. बालपण गरीबीत गेले, पण कॅमेऱयासमोर येताच चेहऱयावर हास्य उमटवून नृत्य करायला सुरुवात करताच त्यांच्या अंगात वेगळीच स्फुर्ती चढते.
इन्स्टाग्राम किंवा पूर्वी टिकटॉकवर या भावाबहिणीच्या जोडीचे नृत्य पाहिले नसेल ही शक्यता फारच कमी आहे. धनबाद जिल्हय़ातील निपनिया या अत्यंत छोटय़ा गावात ते राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब कर्जात बुडालेले होते, पण भावाबहिणीच्या नृत्याने लोकांच्या मनावर जादू केल्याने त्यांचे जगच बदलले आहे.
सद्यकाळात भावाबहिणीच्या कमाईने सात जणांचे पूर्ण कुटुंब चालत आहे. एक वर्षातच सनातन आणि सावित्री यांच्या युटय़ूब चॅनलवर 1 दशलक्षाहून अधिक सब्सक्राइबर्स झाले आहेत.
मिळाली नव्हती नोकरी
पदव्युत्तर शिक्षण घेऊनही 26 वर्षीय सनातनला नोकरी मिळू शकली नव्हती. सनातनचे वडिल दुखन महतो शेतकरी असून त्यांच्याकडे कसायला फारशी जमीन देखील नाही. सनातनला 7 भावंडं आहेत, यातील 3 बहिणींचा विवाह झाला आहे. तर सावित्री महतो ही सनातनपेक्षा वयाने मोठी आहे.
लोकांकडून ट्रोल
भाऊबहिण जेव्हा स्वतःच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करायचे तेव्हा आजूबाजूचे लोक त्यांना नावं ठेवत होते. पण सनातन आणि सावित्रीने याकडे दुर्लक्ष केले. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी डान्सचे व्हिडिओ अपलोड करणे त्यांनी सुरूच ठेवले.
स्वप्नांचा पाठलाग
सावित्री अन् सनातन एका छोटय़ाशा गावातील असून दोघांनी नृत्याचे रितसर प्रशिक्षणही घेतलेले नाही. पण त्यांच्या कहाणीने स्वप्नांना कुठेही अंकुर फुटू शकतो हे दाखवून दिले आहे. स्वप्नांच्या पूर्ततेसाठी केवळ त्यांचा पाठलाग करण्याची गरज आहे.