एक लाख रुपयांहून अधिक निधी सुपूर्द
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे अनुभवी मुष्टियोद्धे विजेंदर सिंग व मनोज कुमार यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णविजेता बॉक्सर डिंग्को सिंगच्या मदतीसाठी निधी जमा करण्याकरिता पुढाकार घेतला आहे. डिंग्को सिंगला यकृताचा कर्करोग झाला असून त्याला उपचारासाठी 25 एप्रिल रोजी दिल्लीत आणले जाणार आहे.
या दोघांसह अन्य काही बॉक्सर्स व प्रशिक्षक यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून एक लाख रुपयाहून अधिक निधी जमा केला आणि ऑनलाईन पेमेंटद्वारा थेट डिंग्को सिंगच्या खात्यावरच ही रक्कम जमाही केली आहे. ‘हम में है दम या नावाने आम्ही व्हॉट्स ग्रुप तयार केला असून मनोजने त्यावर डिंग्को सिंगची माहिती पोस्ट केली होती. हे समजताच त्याच्या बँक खात्याची माहिती घेतली आणि प्रत्येकाला शक्य होईल तेवढी रक्कम त्यात जमा केली,’ असे विजेंदर सिंगने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. विजेंदर सध्या व्यावसायिक मुष्टियुद्ध क्षेत्रात खेळत आहे.
डिंग्को सिंगच्या बँक खात्याचा तपशील मिळाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून या मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये 1000 ते 25,000 रुपयांपर्यंत देणगीदारांनी योगदान दिले असून अजूनही त्यात जमा होत आहेत. आम्ही एक लाखाहून अधिक रक्कम आतापर्यंत जमविली असून अजूनही त्यात जमा होत आहेत, असे विजेंदरने पुढे सांगितले. ‘डिंग्को हा मुष्टियुद्धातील हिरो असून तो आमच्यासाठी आयकॉन खेळाडू आहे. प्रत्येक बॉक्सरला त्याच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडणे अत्यंत गरजेचे आहे. या भावनेतूनच आम्ही सर्वानी पुढाकार घेत त्याला मदत केली आहे,’ असेही त्याने स्पष्ट केले.
डिंग्को सिंग सध्या इम्फाळमध्ये असून रेडिएशन थेरपीसाठी त्याला पंधरा दिवसांपूर्वीच दिल्लीत यायला हवे होते. पण लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक बंद असल्याने त्याला येता आले नव्हते. त्याच्या आजाराचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने त्याच्यासाठी खास एअर ऍम्ब्युलन्सची सोय केली आहे. ‘तो आपलाच आहे. त्यामुळे रक्कम कितीही छोटी असली तरी त्याला अशा वेळी एक सहकारी म्हणून साथ देणे आवश्यक आहे,’ असे मनोज कुमार यावेळी म्हणाला.