वृत्तसंस्था/ कोलंबो
गेल्या महिन्यात ब्रिटनच्या दौऱयावर कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याने लंकन क्रिकेट मंडळाने कुसल मेंडीस, निरोशन डिक्वेला आणि दनुष्का गुणतिलका यांच्यावर एक वर्षांची बंदी घातली असून या खेळाडूंना 1 कोटी रूपयांचा दंड ठोठावल्याची घोषणा केली आहे.
गेल्या महिन्यात लंकेचा क्रिकेट संघ ब्रिटनच्या दौऱयावर मर्यांदित षटकांची मालिका खेळण्यासाठी गेला होता. कोरोना महामारी समस्येमुळे जैविक सुरक्षा (बायो बबल) नियमांचे उल्लंघन लंकेच्या या तीन क्रिकेटपटूंकडून झाल्याने त्यांना हा दौरा अर्धवट स्थितीत सोडून मायदेशी पाठविण्यात आले होते. तसेच लंकेच्या तीन क्रिकेटपटूंच्या चौकशीसाठी शिस्तपालन समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या शिस्तपालन समितीने मेंडीस, गुणतिलका यांच्यावर दोन वर्षांची बंदी तर डिक्वेलावर 18 महिन्यांच्या बंदीची शिफारस केली पण त्यानंतर लंकन क्रिकेट मंडळाने या तिन्ही क्रिकेटपटूंवर कारवाई करताना त्यांना एक वर्षांच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचप्रमाणे या क्रिकेटपटूंना 1 कोटी रूपयांचा दंडही ठोठावला आहे.