नरेश सावळ, डॉ. चंद्रकांत शेटय़े यांच्याकडून नकार : शिल्पा नाईक यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष.ऐनवेळी कुंदन फळारी ठरू शकतात उमेदवार?
प्रतिनिधी /डिचोली
डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांना कोविडची बाधा झाल्याने तसेच त्यांनी निवडणूक लढविण्यास अनुत्सुकता दर्शविल्यानंतर डिचोली मतदारसंघात ऐनवेळी उमेदवार निवडीसाठी भाजपतर्फे प्रयत्नांची शिकस्त होत आहे. सध्याचे मगोचे उमेदवार नरेश सावळ व अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेटय़े यांच्यासमोर भाजपने उमेदवारीची ऑफर ठेवली होती परंतु सदर ऑफर दोघांनीही नाकारल्याने सर्वांचे लक्ष महिला नेत्या शिल्पा नाईक यांच्या भूमिकेकडे आहे.
डिचोली मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो मात्र आज या मतदारसंघात भाजपला उमेदवारी बहाल करण्यासाठी इतरांची दारे ठोठवावी लागत आहेत. ऐनवेळी उमेदवार आयात करण्यासाठी खटाटोप करण्याची वेळ आली आहे. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासह महिला नेत्या शिल्पा नाईक यांनीही लावलेला जोर आणि त्यांची आक्रमकता पाहिल्यावर ऐन निवडणूक काळात उमेदवारीसाठी तेढ निर्माण होण्याची चिन्हे पूर्वीपासूनच दिसत होती. डिचोली मतदारसंघात भाजप पक्षाकडून आमदार राजेश पाटणेकर यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्याला वाव दिला न गेल्याने आज ही पाळी या पक्षावर आली असल्याचे बोलले जात आहे.
शिल्पा नाईक यांचा मार्ग मोकळा, पण…
सध्याच्या या राजकारणात शिल्पा नाईक यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे म्हणता येईल पण या घडीला उमेदवारी स्वीकारणे आणि निवडणुकीला सामोरे जाणे कितपत फायदेशीर ठरणार, हा मोठा मुद्दा नाईक यांच्यासमोर आहे. कारण यापूर्वीच त्यांच्या उमेदवारीसाठी डिचोलीतील काही भाजपच कार्यकर्त्यांनी उघड विरोध दर्शविला होता. त्यामुळे या निवडणुकीत सदर कार्यकर्ते त्यांना विजयी करण्यासाठी काम करणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे. शिल्पा नाईक यांच्याकडून गेल्या पाच वर्षांपासून पक्षाकडे उमेदवारीची मागणी होत आहे परंतु वेळोवेळी त्यांच्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. आज त्यांनाही उमेदवार याच नजरेने मतदारसंघात प्रकाशात आणले असते तर त्यांच्यासाठी आजचे हे आव्हान लिलया स्वीकारणे सोपे ठरले असते. परंतु तसे न झाल्याने उमेदवारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनाही अनेक प्रश्नांची ठोस उत्तरे पक्षाकडून घ्यावी लागणार.
राजकारणात स्वतःची प्रतिमा, लोकांचा विश्वास महत्त्वाचा – नरेश सावळ
आपण राजकारणात सदैव आपली राजकीय प्रतिमा स्वच्छ ठेवली आहे. या पक्षातून त्या पक्षात जाणे आमच्या प्रतिमेला शोभत नाही. आपल्या कोणत्याही गैरकृत्यामुळे कार्यकर्त्यांची मान शरमेने खाली जाणार नाही, याची काळजी आपण सदैव घेतो. जर भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित आपल्याबरोबर कार्यकर्त्यांच्या प्रतिमेवरही टीका झाली असती. आम्ही राजकारणात लोकांसाठी आहोत व लोकांसाठीच राहणार. म्हणूनच स्वतःच्या हिताचा व स्वार्थाचा विचार न करता कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा आपल्यावर असलेल्या विश्वासाचा विचार केला. म्हणूनच आलेली ऑफर नाकारली, अशी प्रतिक्रिया मगोचे उमेदवार माजी आमदार नरेश सावळ यांनी व्यक्त केली.
कोणत्याही पक्षापेक्षा लोकांनी बहाल केलेली उमेदवारी मोठी – डॉ. चंद्रकांत शेटय़े
आम्ही डिचोली मतदारसंघात राजकारण करण्यासाठी नव्हे तर लोकांचे भले करण्यासाठी आलो आहोत. या मतदारसंघाचा बेरोजगारीचा विषय निकालात काढून डिचोलीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आलो आहोत. लोकांना आम्ही अपक्षपणे निवडणूक लढविणार, असा शब्द दिला असून कोणत्याही पक्षाच्या उमेदवारीपेक्षा लोकांनी स्वतः बहाल केलेली उमेदवारी महत्त्वाची आहे. आमच्या कार्याचा केंद्रबिंदू जनता आहे. आम्ही 2012 पासून डिचोलीच्या राजकारणात अपक्षच आहोत. प्रत्येक निवडणूक अपक्ष म्हणूनच लढलो आहोत व आज ही विधानसभा निवडणुकही अपक्षच लढणार आहोत. त्यासाठीच आलेली ऑफर नाकारली, असे अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेटय़े यांनी सांगितले.
नगराध्यक्ष कुंदन फळारींच्या गळय़ात पडू शकते उमेदवारीची माळ
डिचोली मतदारसंघातील या राजकारणात सभापती राजेश पाटणेकर यांच्या भूमिकेनंतर जर शिल्पा नाईक यांनी विजयाची गणिते जुळण्यात कठीण होत असल्याने माघार घेतली तर भाजपसाठी डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांचाही पर्याय खुला आहे. सध्या कुंदन फळारी हे डिचोली नगरपालिका क्षेत्रात बरेच प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रभागात विक्रमी आघाडीने निवडून येत नगराध्यक्ष बनलेले कुंदन फळारी हे नवीन, युवा, चारित्र्यवान चेहरा आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे येऊ शकतात. त्यासाठी पालिका क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागात पक्षाला चांगलाच जोर लावावा लागणार आहे. त्यांची डिचोली नगरपालिका क्षेत्रात प्रतिमा चांगली आहे.