सर्वत्र तयारी अंतिम टप्प्यात. घरांवर व मंदिरांवर आकर्षक विद्यूत रोषणाई. नामवंत गायकांच्या संगीत मैफली.
डिचोली/प्रतिनिधी
आज सोम. दि. 13 डिसेंबर रोजी डिचोलीतील देवी श्री शांतादुर्गेचा प्रसिद्ध “नवा सोमवार” उत्सव गावकरवाडा डिचोली आणि आतीलपेठ डिचोली येथे साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी डिचोलीत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिल्या पावसानंतर बंद झालेली पालखी मिरवणूक पुन्हा सुरू होणार असल्याने पालखीतून देवीच्या स्वागतास डिचोली नगरीतील भाविक सज्ज होत आहे. सर्वत्र आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली असून रस्त्यांच्या बाजूने फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत.
गावकरवाडा डिचोली येथील देवी श्री शांतादुर्गेच्या मंदिरात ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे आज दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर रात्री देवीची पालखी बाहेर निघणार. तर आतीलपेठ डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गेच्या मठमंदिरात श्री शांतादुर्गा देवस्थान नवा सोमवार उत्सव समितीचा हा यावषीचा उत्सव आतीलपेठ दहाजण बाजारकर मंडळातर्फे साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मठमंदिरात सकाळी विविध धार्मिक विधी व इतर कार्यक्रम होणार. रात्री पालखी भाविकांच्या भेटीसाठी बाहेर पडणार.
गावकरवाडा येथील उत्सव
डिचोली येथील ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे श्री शांतादुर्गा देवीचा नवा सोमवार उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक धार्मिक तसेच गायनाच्या मैफली आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त मंदिरात सकाळपासून धार्मिक विधी. दुपारी आरती व तिर्थप्रसादस, रात्री 9 वा. सर्व भक्तजनांच्या उपस्थितीत देवीला गाराणे घालून मोठय़ा जयघोषात शांतादुर्गा भजनी मंडळ, भांबर्डे तसेच हनुमान बँड पथक यांच्या संगतीने पालखी मिरवणूकीला प्रारंभ होणार आहे.
गावकरवाडा येथे गायनाच्या मैफली
पहिली मैफल रात्री 10 वा. गावकरवाडा येथील देवीच्या प्रांगणात होणार आहे. “स्वर सुमनांचे झेले” या नाटय़गीत, भावगीत, भक्तिगीत गायनाचा बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या बहारदार कार्यक्रमात प्रसिध्द गायक श्री जसराज जोशी (पुणे) व गायिका सौ. मनिषा निश्चल (मुंबई) आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूरनिवेदन टिव्ही व आकाशवाणी निवेदिका वर्षा मळीक या करणार आहेत.
या उत्सवातील दुसरी संगीत मैफल पहाटे 1.30 वा. देव श्री रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. “गुंफिले स्वर फुले” या बहारदार नाटय़, सुगम, भक्तिगीतांच्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक श्री अभिषेक मारोतकर (मुंबई) व गायिका तनिषा मावजेकर (गोवा) या आपली कला सादर करणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन संगीता जोशी (मुंबई) या करणार आहे.
आतीलपेठ येथील उत्सव
आतीलपेठ डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गेच्या मठमंदिरात श्री शांतादुर्गा देवस्थान नवा सोमवार उत्सव समितीचा हा यावषीचा उत्सव आतीलपेठ दहाजण बाजारकर मंडळातर्फे हा उत्सव साजरा होणार असून मठमंदिरातील सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. मठमंदिरात सकाळी धार्मिक विधी त्यानंतर सकाळी 9 ते रात्री पालखी मंदिरात येईपर्यंत ओटी फुले नारळ आदी साहित्य स्वीकारण्यात येईल.
श्री देवी शांतदुर्गेची पालखी रात्री 8 वा. देवीची पालखी मठमंदिरातून बाहेर निघेल व श्री लक्ष्मीनारायण मंदिराजवळ भाविकांसाठी रात्री 10 पर्यंत ठेवली जाणार. तेथे या दरम्यान भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 10 वा. बँड पथकासह पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार. पालखी आतीलपेठ, सोनारपेठ, भायलीपेठ व बोर्डे वडाकडे पर्यंत जाऊन माघारी फिरणार. भायलीपेठ, सुंदरपेठ मार्गे आतीलपेठ येथील मठमंदिरात मंगळवारी दुपारी विधीवतपणे दाखल झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे.
गायनाच्या संगीत मैफली
आतीलपेठ येथील या उत्सवातील पहिली संगीत मैफल आतीलपेठ मठमंदिरात होणार आहे. त्यात प्रसिध्द गायिका सौ. दिपिका भिडे भागवत (मुंबई) व श्री धनंजय म्हसकर (मुंबई) हे बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर रोहिदास परब, संवादिनीवर मनोज गणपुले हे साथसंगत करतील. या कार्यक्रमाचे ध्वनी संकलन सर्वेश फुलारी यांचे राहिल.
या उत्सवाची दुसरी संगीत मैफल रात्री 11 वा. गुरूफंड ट्रस्ट, भायलीपेठ येथे होणार आहे. या मैफलीत प्रसिध्द गायक श्री सुरेंद्र न. गोवेकर व सौ. भाग्यश्री आठल्ये जोशी (देवगड) या गायन सादर करणार आहेत. तर त्यांना तबल्यावर महेश वझे, संवादिनीवर जयेंद्र गोवेकर, पखवाज ओंकार गावकर, मंजिरीवर गोपाळ प्रभू हे कलाकार साथसंगत करतील. या कार्यक्रमाचे सुत्रनिवेदन नितीन रावळ हे करणार तर ध्वनीसंकलन नरेश नाईक यांचे असेल.
या उत्सवासाठी डिचोलीत सर्वत्र तयारी अंतिम टप्प्यात असून रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. गेल्यावषी कोवीडच्या धास्तीमुळे हा उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. फेरीवाल्यांनी मर्यादित स्वरूपात दुकाने थाटली होती. तसेच मठमंदिरातील पालखी मिरवणूकीत भाविकांच्या ओटय़ा स्विकारण्यात आल्या नव्हत्या. यावषी कोवीड परिस्थिती नियंत्रणात असल्याने हा उत्सव मोठय़ा उत्साहाने व थाटामाटात साजरा करण्यात येणार असल्याने डिचोलीत उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण पसरले आहे.