प्रत्येकाला मिळणार हेल्थ आयडी, इतर अनेक लाभ- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाँन्चिंग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ चा प्रारंभ केला आहे. या अभियानामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेत तसेच आयोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारक परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकाला विशिष्ट आरोग्य क्रमांक (हेल्थ आयडी) मिळणार असून इतर अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत.
गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या उपचार विषयक समस्या सोडविण्यासाठी ही योजना आहे. देशभरात रुग्णांचा रुग्णालयांशी सहज संपर्क, आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घडवून आणणे, रुग्णांना त्वरित उपचार मिळवून देण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे आणि रुग्णांचा प्रकृतीविषयक इतिहास सहजगत्या उपलब्ध करुन देणे, ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टय़े आहेत.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चौथ्या वर्षात पदार्पण करीत असताना, याच दिवसाचे औचित्य साधून हे नवे अभियान साकारले जात आहे. भारताने गेल्या काही वर्षात डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधा मोठय़ा प्रमाणात निर्माण केल्या आहेत. युपीआय योजना आणि कोविन प्लॅटफॉर्म ही याचीच उदाहरणे आहेत. कोविन प्लॅटफॉर्मवरुन लसीकरण झालेल्या व्यक्तीना त्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळते, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘राशन टू प्रशासन’
युपीआय योजना सर्वांसाठी अत्यंत लाभदायक ठरली आहे. रेशनपासून प्रशासनापर्यंतच्या सर्व बाबी या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. देशात आज 118 कोटी मोबाईल धारक आहेत. 80 कोटी इंटरनेट उपयोगकर्ते आणि 43 कोटी जनधन बँके खातेदार आहेत. संपूर्ण जगात इतक्या व्यापक प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञान प्रशासनासाठी उपयोगात आणण्यात आलेले नाही. याचे संपूर्ण श्रेय भारतीयांचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
लसीकरणाचा विक्रम
देशात आज 90 कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीची किमान एक मात्रा देण्यात आली आहे. जितक्या कमी कालावधीत हा आकडा गाठण्यात आला, तो एक विक्रमच मानावा लागेल. बहुतेकांना या लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
आयुष्मान भारत अभियान…
ड या अभियानाची घोषणा पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टला केली होती
ड हे अभियान प्रायोगिक तत्वावर देशात काही ठिकाणी लागू केले आहे
ड आता या अभियानाचा संपूर्ण देशात अवलंब करण्याची योजना आहे
ड या अभियानाच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला विशिष्ट आरोग्य क्रमांक
ड आपले व्यक्तिगत वैद्यकीय रेकॉर्ड या क्रमांकाला जोडले जाऊ शकणार
ड यात आपल्या प्रत्येक चाचण्या, प्रत्येक आजार यांची नोंद असणार
ड आपले डॉक्टर्स, त्यांनी केलेल्या तपासण्या, औषधे यांची नोंद असणार
ड ही सर्व माहिती एका मोबाईल ऍपद्वारे आपल्याला वाचता येणार
ड आपल्या डॉक्टरांना या माहितीचा उपयोग उपचार करताना होणार
ड आरोग्य व्यावसायिकांचे रजिस्टर, आरोग्य सुविधांचे रजिस्टर ठेवणार
ड या रजिस्टर्सचा उपयोग आधुनिक किंवा पारंपरिक उपचारांमध्ये होणार
ड या माहितीचा उपयोग डॉक्टर्सना होणार असल्याचे उपचार सहजगत्या
ड या महितीचा उपयोग संबंधित व्यक्तीच्या अनुमतीनेच केला जाणार
ड ही सर्व माहिती आणि डाटा वैद्यकीय संशोधनासाठीही उपयोगी ठरणार
ड या अभियानांतर्गत एका क्लिकवर देशात कोठेही उपचार मिळू शकणार