ऑनलाईन चित्रपट, वृत्तसामग्रीवर देखरेख
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने एका आदेशाद्वारे ऑनलाईन प्रसारमाध्यमांसह सर्व डिजिटल व्यासपीठांना माहिती तसेच प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत आणले आहे. म्हणजेच आता या प्लॅटफॉर्म्सचे नियमन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या देखरेखीत होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मागील बैठकीत यासंबधीचा प्रस्ताव संमत केला होता, ज्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केले आहे. याचबरोबर नवा आदेश तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे. ऑनलाईन विषय-वस्तू प्रदात्यांकडून उपलब्ध करण्यात आलेला चित्रपट तसेच दृकृ-श्राव्य कार्यक्रम आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर वृत्त तसेच तत्सम विषय-वस्तू म्हणजेच डिजिटल आणि ऑनलाईन प्रसारमाध्यमे आता माहिती तसेच प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत आल्याचे राष्ट्रपती भवनाकडून प्रसारित आदेशात नमूद करण्यात आले आहे.