28 रुपयांनी दर वाढल्याची सूत्रांची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तेल विपणन कंपन्यांनी घाऊक स्वरुपात डिझेलच्या खरेदीवर 28 रुपये प्रतिलिटरपर्यंत दरवाढ केल्याचे समजते. पेट्रोल-डिझेल विक्रीवर होत असलेला तोटा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही दरवाढ केवळ घाऊक खरेदीदार म्हणजेच बस ऑपरेटर्स आणि मॉल इत्यादींमध्ये वापरण्यासाठी खरेदी केल्या जाणाऱया डिझेलकरिता करण्यात आली आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी कुठलीच दरवाढ करण्यात आलेली नाही.
तेल कंपन्यांनुसार सलग पाचव्या महिन्यात पेट्रोलपंपांवरील विक्री वाढली आहे. स्वस्त डिझेलसाठी बस ऑपरेटर्स आणि मॉल यासारखे घाऊक खरेदीदारदेखील पेट्रोलियम कंपन्यांकडून थेट टँकर मिळविण्याऐवजी पंपावरून डिझेल खरेदी करत आहेत. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचे नुकसान वाढत आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी कंपन्या स्वतःच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत.
मुंबईत घाऊक खरेदीदारांसाठी डिझेलची किंमत वाढून 122.05 रुपये प्रतिलिटर झाली आहे. तर पेट्रोलपंपांवर डिझेल 94.14 रुपये प्रतिलिटर विकले जाते.
अशा स्थितीत घाऊक खरेदीदारांना डिझेलसाठी प्रतिलिटर 28 रुपये अधिक द्यावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल पंपांवर डिझेल 86.67 रुपये प्रतिलिटर आहे. तर घाऊक किंवा औद्योगिक ग्राहकांसाठी याची किंमत 115 रुपये प्रतिलिटर इतकी आहे.
खासगी कंपन्यांना मोठे नुकसान
सर्वाधिक नुकसान नायरा एनर्जी, जियो-बीपी आणि शेल यासारख्या खासगी रिटेल डिस्ट्रिब्युटर्सना झाले आहे. 2008 मध्ये सार्वजनिक क्षेत्राच्या रिटेल डिलर्सना कमी किमतीवर पेट्रोल आणि डिझेल विकण्यासाठी सरकारने अनुदान दिले होते, परंतु खासगी रिटेल डिलर्सना या योजनेतून वगळले होते. यावेळी पीएसयू रिटेल डिलर्सना हाय रिफायनिंग मार्जिनमधून स्वतःच्या नुकसानाची भरपाई करण्यास सांगण्यात आले आहे. परंतु प्रायव्हेट रिटेल डिलर्स म्हणजेच नायरा एनर्जी, जियो-बीपी आणि शेल यासारख्या कंपन्यांकडे स्वतःच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी रिफायनरिज नाहीत. याचमुळे त्यांना अधिक नुकसान होतेय. अशा स्थितीत पंप बंद करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे.
रिलायन्सने पुरवठा घटविला
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने स्वतःच्या इंधन वितरकांना डिझेल पुरवठय़ात 50 टक्के कपात करण्यास सांगितले आहे. कंपनीला याच्या विक्रीवर 10-12 रुपये प्रतिलिटर इतका तोटा होतोय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास आहे. तर तेल कंपन्यांनी 3 नोव्हेंबरपासून पेट्रोलच्या दरात कुठलाच बदल केलेला नाही. परंतु तेव्हापासून आतापर्यंत कच्चे तेल 30 डॉलर्सनी प्रति बॅरलपेक्षा अधिक महाग झाले आहे. याचमुळे घाऊक खरेदीदारांसाठी डिझेल महाग करण्यात आले आहे.
उत्पादन शुल्कात कपात?
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करू शकते. केंद्र सरकारने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान दोनवेळा पेट्रोल-डिझेलवर आकारल्या जाणाऱया उत्पादन शुल्कात 15 रुपये प्रतिलिटरने वाढ केली होती. परंतु मागीलवर्षी 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोलवरील 5 तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये प्रतिलिटरने कपात केली होती.