महापालिका आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
सदाशिवनगर स्मशानभूमीतील डिझेलवर चालणाऱया शवदाहिनीसाठी 46 लाख रुपये खर्ची घालण्यात आले. पण अंत्यविधीसाठी 45 लीटर इंधन लागत असल्याने खर्चिक होत आहे. सदर शवदाहिनीचा खर्च परवडत नसल्याने वापर थांबला आहे. त्यामुळे गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांना देण्यात आले.
माहिती हक्क अधिकारांतर्गत शवदाहिनीसाठी खर्ची घालण्यात आलेल्या निधीची माहिती घेण्यात आली असता, याकरिता 46 लाख रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. अंत्यविधीसाठी दीड ते दोन तास लागत असल्याचे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात हा ताळमेळ बसत नसल्याचे निदर्शनास आले असून 60 लाखांहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच अंत्यविधीसाठी 45 लीटर इंधन आणि 6 तास वेळ लागत आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी 4 हजार 500 रुपयांहून अधिक खर्च येत आहे. त्यामुळे याचा भुर्दंड नागरिकांना बसतो. अंत्यविधीसाठी जास्त खर्च होत असल्याने डिझेलवर चालणाऱया शवदाहिनीवर अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे सदर शवदाहिनीचे परिवर्तन गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. नागरिक आणि करदात्यांच्या मागणीनुसार गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्यात आल्यास याचा वापर होऊ शकतो. सदर निवेदन महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांना शुक्रवारी देण्यात आले. शवदाहिनीचे परिवर्तन करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येईल, याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी दिले. या निवेदनाची प्रत नगरविकास खात्याला देखील पाठविण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना विनय नाताजी चव्हाण, गजेश नंदगडकर, संदीप चौगुले, गौरव कुलकर्णी, अभिषेक कुरणे, गौरव अनगोळकर, सुरज पाटील, लखन चव्हाण आदी उपस्थित होते..