ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेले सुमारे महिनाभर सुरु असलेलं युक्रेन – रशिया युद्ध काही केल्या थांबायला तयार नाही. दिवसें – दिवस विध्वंसक क्षेपणास्त्रांचा वापर करत युक्रेनला गुडघे टेकायला भाग पाडणे हा रशियाचा मनसुभा असुन, युक्रेन ही आपल्या निर्णयावर ठाम आहे. या साऱ्यामुळे मात्र दोन्ही राष्ट्रांसह जगाची सामाजिक, अर्थिक, नैसर्गिक हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर रशिया हा नैसर्गिक वायु, इंधन यांसारख्या वस्तु मोठ्या प्रमाणात निर्यात करणारा देश आहे. हा पुरवठाच मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक वायु, इंधन यांचे दर झपाट्याने वाढत आहेत. याच पार्श्वभुमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलांच्या किंमती ४० टक्क्यांनी वाढल्या असल्याने डिझेलच्या किंमती ही वाढल्या आहेत.
घाऊक खरेदी करणाऱ्या कंपन्या, आस्थापने, उद्योग यांना याचा मोठा फटका बसला आहे. कारण त्यांना डिझेल खरेदी करताना आता लीटरमागे २५ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. मात्र दिलासायदाक बाब म्हणजे किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही. घाऊक खरेदी करणारे बस ऑपरेटर्स, मॉल्स यांच्यासारखे मोठे वापरकर्ते नेहमीप्रमाणे तेल कंपन्यांना थेट ऑर्डर देत नसून इंधन खरेदी करण्यासाठी पेट्रोल पंपांवर रांगा लावत असल्याने पेट्रोल पंपावरील विक्रीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना नुकसान सहन करावं लागत आहे.
सर्वात जास्त नुकसान नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल सारख्या खासगी किरकोळ विक्रेत्यांना बसला आहे, ज्यांनी आतापर्यंत विक्रीत वाढ होऊनही प्रमाण कमी करण्यास नकार दिला आहे. पण दरात १३६ दिवसांमध्ये बदल न झाल्याने त्याच दरात अधिक इंधन विकण्यापेक्षा पंप बंद करणे हा अधिक योग्य उपाय असल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल आणि इंधनाच्या किंमतीत वाढ होत असताना भारतात सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ४ नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केलेली नाही. चार राज्यांमध्ये असणाऱ्या निवडणुकांमुळेच भाजपाने किंमती वाढू दिल्या नसल्याचं बोललं जात होते. १० मार्चला मतमोजणीनंतर या किंमती वाढतील अशी शक्यता होती. पण अद्याप तसं झालेलं नाही.