सलग दुसऱया दिवशी दरवाढ – चार राज्यांमध्ये ओलांडला 100 रुपयांचा टप्पा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सलग दुसऱया दिवशी देशात सोमवारी डिझेलच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली आहे. नव्या दरवाढीमुळे राजधानी दिल्लीत डिझेल 89.32 रुपयांवर पोहोचले आहे. यापूर्वी रविवारीही डिझेलच्या किमतीत 25 पैशांनी वाढ झाली होती. मात्र, पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल दर 101.19 रुपये प्रतिलिटर इतका आहे. चालू वर्षात आतापर्यंत पेट्रोल 17.22 रुपयांनी आणि डिझेल 15.20 रुपयांनी महाग झाले आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे ब्रेंट क्रूड, कच्च्या तेलाचा बेंचमार्क 78 डॉलर प्रतिबॅरलची पातळी ओलांडून 78.20 डॉलरवर पोहोचला. तसेच कच्चे तेल 3 वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये ते 78.24 वर पोहोचले होते. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी वाढू शकतात. कच्च्या तेलाची वाढती मागणी पाहता येत्या काळात ते 80 डॉलरपर्यंत जाऊ शकते. साहजिकच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी 2 ते 3 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी डिझेलचे दर 100 रुपये प्रतिलिटरच्या वर पोहोचले आहेत. तर देशातील 20 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांवर पोहोचले आहे. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा, पंजाब, सिक्कीम, ओडिशा, केरळ, दिल्ली, तामिळनाडू आणि राजस्थानच्या सर्व जिल्हय़ांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, नागालँड आणि छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे आहे.