शारंग तोफेसह 13 अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे सादरीकरण : विविध देशांचा सहभाग
वृत्तसंस्था/ लखनौ
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत 11 व्या डिफेन्स एक्स्पोमध्ये 71 कंपन्यांशी करार करण्यात आले आहेत. रशिया आणि स्पेनसोबत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा करार झाला असून ही कंपनी पाणबुडीची निर्मिती करणार आहे. या निर्मितीकार्यात रशिया आणि स्पेनचे सहाय्य मिळणार आहे. संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते 13 शस्त्रास्त्रांचे सादरीकरण करण्यात आले आहे. ब्रिटनसोबत देखील संरक्षण सहकार्याचा करार झाला आहे.
भारताची संरक्षण सामग्रीची निर्यात 7 पटीने वाढली असून 2024 पर्यंत हा आकडा 5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे. उत्तरप्रदेशात संरक्षण निर्मिती क्षेत्र तयार होत असून अनेक प्रकल्पांची स्थापना होणार असल्याचे राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.
उत्तरप्रदेशशी 23 करार
भारताला संरक्षण सामग्री निर्मितीसह संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात स्वावलंबी करण्याच्या दिशेने सुरू झालेले प्रयत्न नवी उंची गाठत आहेत. डिफेन्स एक्स्पोमध्ये शुक्रवारी अनेक करार झाले असून त्यांना ‘बंधन’ नाव देण्यात आले आहे. उत्तरप्रदेश सरकारसोबत युपीडाच्या माध्यमातून 23 सामंजस्य करार झाले असून 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 3 लाख जणांना रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
शारंग तोफ
मेक इन इंडिया मोहिमेच्या अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शारंग तोफेसह अत्याधुनिक शस्त्रास्त्रs सैन्याला सोपविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय मापदंडांचे पालन करत शारंग तोफेची निर्मिती करण्यात आली आहे. जेव्हीपीसी अल्फा कार्बाइन, बेल्टफेड एलएमजी, अमोघ-3 वरुणास्त्र, नाविक रिसिव्हर, डोमिनेटर ड्रोन, फायबर ऑप्टिकल गॅरो बेस्ड आयएनएस सिस्टीम, स्कॉर्पियन शेणीतील पी-75 आय पाणबुडीसह 13 उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले आहे.