एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे बाजारमूल्य 2.17 लाख कोटी रुपयावर – मारुती सुझुकी, लार्सन ऍण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंटपेक्षाही सरस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांची कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे बाजारमूल्य 2.17 लाख कोटी रुपयावर पोहोचले आहे. रिटेलचेन डी मार्टला सहकार्य करणाऱया या कंपनीने मारुती सुझुकी, लार्सन ऍण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट आणि ओएनजीसी यासारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे. यामध्ये एव्हेन्यू सुपरमार्ट्स आता देशातील 17 वी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे.
सदरची कंपनी मार्च 2017 मध्ये लिस्ट झाली होती. यामध्ये कंपनीने मागील चार वर्षांमध्ये आपल्या इश्यू प्राईसमधून 1000 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे. डि मार्टचे समभाग हे 295 ते 299 रुपयावर प्राईस ब्रँड सादर केले होते. लिस्टिंगच्या दरम्यान कंपनीचे बाजारमूल्य 40,000 कोटी रुपयापेक्षा कमी राहिले होते. हा समभाग 604 रुपयावर लिस्ट झाला होता आणि एकाच दिवसामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले होते. चालू वर्षात सदरचे समभाग आतापर्यंत 21 टक्क्यांनी वधारले असल्याची माहिती आहे.
दमानींची संपत्ती
कंपनीच्या समभागात तेजी राहिल्याने दमानींची संपत्ती ही 18 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. तसेच देशातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये दमानींचा नंबर लागला आहे. चालू वर्षात त्यांची संपत्ती 3.1 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. मार्च तिमाहीत एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा निव्वळ नफा 52.76 टक्क्यांनी वाढून 414 कोटी रुपयावर राहिला आहे. मागील वर्षात समान तिमाहीत हा आकडा 271 कोटी रुपये होता.