कोरोना रुग्णांच्या उपचारावरील औषधाची किंमत जाहीर
हैदराबाद / वृत्तसंस्था
डीआरडीओच्या कोरोनावरील औषधाची किंमत जाहीर झाली. ‘2-डीजी’ या औषधाच्या एका पाकिटाची किंमत 990 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. 2-डीजी हे औषध जूनच्या मध्यापर्यंत बाजारातही उपलब्ध होणार आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये औषधाचा पुरवठा सुरू झाला असून केंद्र आणि राज्य सरकारांना डीआरडीओच्या या औषधाची पाकिटे सध्या सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत.
भारत सरकारच्या डीआरडीओ या संस्थेने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बनवलेल्या 2 डेऑक्सी-डीöग्लुकोजच्या (2-डीजी) आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने आणि ड्रग कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मंजुरी दिली होती. भारतातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला होता. या औषधाची निर्मिती डीआरडीओच्या आयएमएस आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी एकत्रितपणे ठरविली आहे. औषधांच्या व्यावसायिक वितरणाची जबाबदारीही डॉ. रेड्डीज लॅबने घेतली आहे. औषधाची खुल्या बाजारातील विक्री सुरू झाली आहे.
कोरोनावरील उपचारासाठी प्रभावी
औषधाचे उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबकडून करण्यात येत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोना मॉडरेट आणि गंभीर रुग्णांसाठी ते दिले जाऊ शकते. हे औषध पावडर स्वरूपात मिळते. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावे लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचे काम करते. त्यासोबतच रुग्णाच्या शरीरातील ऊर्जा वाढवण्याचेही काम करते असा दावा करण्यात आला आहे. कोरोना रुग्णाचे व्हेंटिलेटर अथवा ऑक्सिजन सिलेंडरवरील अवलंबित्व कमी होत असल्यामुळे कोरोना रुग्णांना एक सहाय्यक औषध म्हणून डीआरडीओचे औषध प्रभावी ठरणार आहे.