अरबाज मुल्ला याचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी केली तपासणी
प्रतिनिधी /खानापूर
खानापुरात गेल्या महिन्यात दहा जणांच्या टोळीने हत्या केलेल्या अरबाज मुल्ला याचा दफनविधी खानापूरच्या स्मशानभूमीत झाला होता. पण न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होताना त्याच्या डीएनए तपासणीची पोलिसांना गरज होती. यामुळे पोलीस यंत्रणेने न्यायालयातून रितसर परवानगी घेऊन अरबाज याचा मृतदेह दफनविधी झालेल्या खड्डय़ातून बाहेर काढला. व डीएनए तपासणीसाठी आवश्यक असलेल्या शरीरातील अवयवाची माहिती घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी दफन करण्यात आले.
अरबाज मुल्ला याची दि. 28 सप्टेंबर रोजी हत्या करुन त्याच्या शरीराचे तीन भाग केले होते. तसेच त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर ठेवण्यात आला होता. याची माहिती दि. 29 सप्टेंबरला मिळाली. त्यावेळी रेल्वे पोलिसानी घटनास्थळी जावून तपासणी केली होती. यानंतर उत्तरीय तपासणी करुन त्याचा दफनविधी करण्यात आला होता. या हत्येचा तपास पोलिसानी अवघ्या आठ दिवसात लावून दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात य गुन्हय़ाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. अरबाजच्या शरीराचे तीन भाग केल्याने तो मृतदेह अरबाज याचाच आहे. याची शहनिशा करण्यासाठी डीएनए अहवालाची गरज भासणार आहे. पण डीएनए तपासणी दफन विधी करण्यापूर्वी केली नव्हती. यामुळे पोलिसांनी न्यायालयाकडे अर्ज करुन डीएनए तपासणीसाठी अरबाज मुल्ला याचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयीन परवानगीनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढून डीएनए तपासणी करण्यात आली व पुन्हा तो मृतदेह त्याच ठिकाणी दफन करण्यात आला.