वृत्तसंस्था/ लंडन
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हवामानाचा व्यत्यय आल्यास डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत वापरली जाते, त्या पद्धतीचे एक जनक टोनी लुईस यांचे निधन झाल्याची माहिती इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने गुरुवारी पत्रकाद्वारे दिली. निधनसमयी टोनी लुईस 78 वर्षांचे होते. ‘टोनी लुईस एमबीई यांच्या निधनाचे वृत्त आताच आम्हाला समजले’, असे ईसीबीने पत्रकातून नमूद केले.
टोनी यांच्यासह अन्य गणितज्ञ प्रँक डकवर्थ यांनी डकवर्थ-लुईस पद्धत स्थापिली आणि आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल) 1999 मध्ये त्याचा अधिकृतरित्या स्वीकार केला. पुढे 2014 मध्ये त्याचे ‘डकवर्थ-लुईस-स्टर्न मेथड’, असे नामकरण केले गेले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा विशेष वापर होत राहिला. पावसाचा व्यत्यय आल्यानंतर ही पद्धत 100 टक्के अंमलात आणली जाते.
टोनी व प्रँक यांच्या अनमोल योगदानामुळे क्रिकेट विश्व सातत्याने, आजन्म त्यांचे ऋणी राहील. टोनीच्या कुटंबियांना आम्ही शोकपर संदेश पाठवला आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत’, असे ईसीबीने यावेळी पत्रकात नमूद केले.
डकवर्थ-लुईस पद्धत आणि त्यापूर्वीच्या पद्धतीत एक फरक असा होता की, त्यात धावांचे संरक्षण करणाऱया संघांना घेतलेल्या बळींचे व धावांचा पाठलाग करणाऱया संघांना त्यांनी केलेल्या धावांचे त्यांना श्रेय मिळत असे. यामुळे, एकापेक्षा अधिक वेळा पावसाचा व्यत्यय आला तरी सुधारित लक्ष्य देण्यास सुरुवात झाली.
मागील दोन दशकात डकवर्थ-लुईस पद्धतीने देण्यात आलेले सुधारित लक्ष्य अवघ्या क्रिकेट जगताला धक्के देणारे ठरत आले आहेत. पण, तरीही अद्याप त्यापेक्षा कोणतीही सरस पद्धत शोधता आलेली नाही.