पुणे / वार्ताहर :
सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य सरकारने जप्त केलेल्या बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी, असा आदेश विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिला आहे.
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे नातेवाईक यांच्या 463 स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ठेवीदारांचे पैसे परत मिळावे म्हणून त्यांची विक्री करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने या संपत्तीची विक्री करण्याबाबत जाहीर नोटीस काढावी, असे आदेश दिले आहेत. नोटीस काढल्यानंतर संबंधित संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास त्यांनी तीन फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहून आपल्या हरकती नोंदवाव्यात. त्या हरकतींचा निपटारा झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असे न्यायालयाने सांगितले.
संपत्तीची विक्री केल्यानंतर त्यातून मिळालेले पैसे पहिल्यांदा डीएसके यांनी ज्या बँकांतून कर्ज घेतले त्यांना देण्यात येणार आहेत. त्यानंतर शिल्लक राहिलेले पैसे ठेवीदारांना देण्यात येतील. पुणे, वणी आणि लोणावळा यासह राज्यभरात डीएसके यांची संपत्ती आहे. त्यांच्या विक्रीतून सुमारे दीड हजार कोटी रुपये जमा होऊ शकतात, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली.