पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह होणार सहभागी : पोलीस सुधारणेचा मुद्दा महत्त्वपूर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीमुळे देशातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची वार्षिक परिषद पुढील महिन्यात पहिल्यांदाच डिजिटल माध्यमातून होणार आहे. या दोन दिवसीय डिजिटल परिषदेत सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारचे डीजीपी आणि आयजीपी स्तरीय सुमारे 250 अधिकारी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील या परिषदेत भाग घेतील.
आपत्ती तसेच जागतिक महामारी, सायबरगुन्हे, तरुणाईमधील कट्टरवाद आणि जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुरस्कृत दहशतवाद यासारख्या समस्यांना तोंड देताना पोलिसांनी बजावलेल्या भूमिकेवर परिषदेत चर्चा केली जाणार आहे. परिषद नोव्हेंबरच्या अंतिम आठवडय़ात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱयाने दिली आहे.
या मुद्दय़ांवर चर्चा
कोरोना महामारीदरम्यान पोलिसांनी बजावलेल्या भूमिकेच्या कौतुकासह या बैठकीत नैसर्गिक आपत्ती आणि अशाप्रकारच्या आरोग्य संकटांना हाताळण्यासाठी पोलिसांची माहिती तसेच क्षमता वाढविण्याच्या पद्धतींवर चर्चा होणार आहे. राज्यांचे पोलीस प्रमुख जागतिक महामारीला हाताळण्यासंबंधीचे स्वतःचे अनुभव मांडतील आणि पोलिसांनी देशव्यापी टाळेबंदीदरम्यान संकटग्रस्त लोक आणि स्थलांतरित मजुरांना कशाप्रकारे मदत केली हे सांगणार आहेत.
डिजिटल आयोजन
पंतप्रधान मोदी महामारी रोखण्यासाठी पोलिसांच्या कार्याचा विशेषत्वाने उल्लेख करू शकतात. एका अनुमानुसार देशात सुमारे 75,000 पोलीस तसेच निमलष्करी दलाच्या जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील सुमारे 600 कर्मचाऱयांना जीव गमवावा लागला आहे. इतिहासात पहिल्यांदाच गुप्तचर विभागाकडून आयोजित डीजीपी आणि आयजीपी स्तरीय अधिकाऱयांची वार्षिक परिषद डिजिटल माध्यमाद्वारे होणार आहे. सर्व अधिकारी स्वतःच्या मुख्यालयांमधून यात भाग घेणार आहेत.
सातत्याने आयोजन
2014 मध्ये नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून या परिषदेचे आयोजन राष्ट्रीय राजधानीच्या बाहेर होत आले आहे. यापूर्वी ही परिषद गुवाहाटी, गुजरातमधील कच्छचे रण, मध्यप्रदेशातील टेकनपूर तसेच पुणे येथे झाले होते.