क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळवडी मल्लम्मा येथे बेळवडी मल्लम्मा जन्मोत्सवानिमित्त युवजन क्रीडा खाते बेळगाव आयोजित खुल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत पुरूष गटात डीवायएसएस संघाने महालिंगपूर संघाचा 2-1 अशा सेटमध्ये तर महिला गटात बैलूर संघाने डीवायएसएस बेळगावचा पराभव करून बेळवडी मल्लम्मा चषक पटकाविला.
बेळवडी मल्लम्मा येथे उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन युवजन क्रीडा अधिकारी बसवराज मेलनट्टी, व्हॉलिबॉल प्रशिक्षक बसवराज होसमठ व ग्रा. पं. सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 20 पुरूषांच्या व सहा महिला संघांनी भाग घेतला होता.
महिलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बैलूर संघाने धारवाड संघाचा 25-18, 25-16 तर दुसऱया उपांत्य सामन्यात डीवायएसएस संघाने बेवट्टी संघाचा 25-21, 19-25, 15-11 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱया क्रमांकाच्या सामन्यात बेवट्टी संघाने धारवाड संघाचा 2-1 असा पराभव केला. अंतिम सामन्यात बैलूर संघाने डीवाएसएसचा 21-16, 21-25, 15-13 अशा सेटमध्ये पराभव करून चषक पटकाविले.
पुरूष गटात पहिल्या उपांत्य सामन्यात महालिंगपूर संघाने निपाणी संघाचा 25-19, 20-25, 15-10 तर दुसऱया उपांत्य फेरीच्या सामन्यात डीवायएसएस संघाने धारवाड संघाचा 25-17, 16-25, 15-11 असा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱया क्रमांकाच्या सामन्यात धारवाड संघाने निपाणी संघाचा 25-11, 25-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून तिसरा क्रमांक मिळविला. अंतिम सामन्यात डीवायएसएस संघाने महालिंगपूरचा 25-19, 22-25, 16-14 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बसवराज मिलनट्टी, डीसीसी बँकेचे मॅनेजर डी. वाय. बागेवाडी, बसवराज होसमठ हर्षवर्धन सिंगाडे यांच्या हस्ते बक्षिसे देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रकाश गुंडण्णावर, बी. एस. बरमण्णावर, हर्षवर्धन सिंगाडे, प्रकाश कोळी, शंकरगौडा, उमेश मजुकर यांनी काम पाहिले.