प्रतिनिधी/ कराड
कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांची नागपूर शहर साहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर बदली झाली आहे. गुरव यांनी वर्षभरापूर्वीच सप्टेंबर 2019 रोजी कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यभार घेतला होता. गुरव यांनी कराडच्या गुंडगिरीला चांगलाच हिसका दाखवला होता.
कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून 24 सप्टेंबर 2019 रोजी सुरज गुरव यांनी कार्यभार स्वीकारला होता. चिपळूणवरून त्यांनी कराडचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी मोडीत काढण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. कुख्यात गुंडांवर कारवाईची मोहीम गुरव यांनी हाती घेतली होती. कोरोना सुरू झाल्यानंतर त्यांनी लॉकडाऊन काळात कडक बंदोबस्त केला. लॉकडाऊन शिथील झाल्यावर कराडच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी गुरव यांनी पुढाकार घेतला. गणेशोत्सव काळात एक गाव एक गणपती उपक्रमासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतल्याने कराड तालुक्यात 165 हून अधिक गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबवला गेला. दोन आठवडय़ापूर्वी त्यांचा व कुटुंबाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोरोनावर मात करून ते नुकतेच बरे झाले होते. बुधवारी त्यांची नागपूर शहरला सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाल्याची ऑर्डर आली आहे.
कराडच्या गुन्हेगारीला जरब बसवणाऱया गुरव यांची वर्षातच बदली झाल्याने सर्वसामान्य कराडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडियावर चमकोगिरी करणाऱया गुन्हेगारांना गुरव यांनी चाप बसवला होता.