वृत्तसंस्था/ केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी आणि अव्वल फलंदाज एबी डिव्हिलीयर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय यापूर्वीच घेतला असून आगामी आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या देशाच्या संघाकडून न खेळण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात आले.
2018 च्या मे महिन्यात डिव्हिलीयर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. दरम्यान चालू वर्षांअखेर भारतात होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी डिव्हिलीयर्सचे दक्षिण आफ्रिका संघात पुनरागमन करण्याची चर्चा सुरू होती. पण दक्षिण आफ्रिका संघाचे प्रमुख प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्याबरोबर डिव्हिलीयर्सने आपल्या पुनरागमनाबाबत चर्चा केली. डिव्हिलीयर्सने यापूर्वीच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा घोषणा केली असल्याने आता तो पुन्हा या क्षेत्रात पुनरागमन करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगण्यात आले. येत्या काही महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिका विंडीज आणि आयर्लंडविरूद्ध वनडे मालिका खेळणार असून या मालिकांसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली. डीन एल्गारकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या संघात नवोदित फिरकी गोलंदाज सुब्रायन आणि मध्यमगती गोलंदाज लिझाद विल्यम्स यांचा समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 10 जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी 19 जणांचा संघ क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने जाहीर केला आहे. या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ विंडीजमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. विंडीज दौऱयानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ आयर्लंडमध्ये दाखल होणार आहे. उभय संघात 11 ते 25 जुलै दरम्यान तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची पुनर्बांधणी प्रक्रिया सुरू असून या आगामी दौऱयात संघात निवडण्यात आलेले खेळाडू चांगली कामगिरी करतील, अशी आशा निवड समिती समन्वयक व्हिक्टर मिसँग यांनी व्यक्त केली.
दक्षिण आफ्रिका संघ- डीन एल्गार (कर्णधार), बवुमा, डि कॉक, एर्वि हेंड्रिक्स, लिन्डे, केशव महाराज, एन्गिडी, मार्करम, मुल्डेर, नॉर्त्जे, के.पीटरसन, रबाडा, व्हान डर डय़ुसेन, व्हेरेनी, शम्सी, विल्यम्स, सुब्रायन, जेनसेन.