गतवर्षी प्रेमने मॅरेथॉन स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक : कावळेवाडी रस्त्यावर करतोय रोज सराव
वार्ताहर /किणये
कावळेवाडी गावचा सुपुत्र प्रेम बुरुड याने गेल्यावर्षी बेंगळूर येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. तो 10 वर्षाचा असून पुढील ध्येय गाठण्यासाठी रस्त्यावर रोज सराव करीत आहे. या बालकाचे डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फेसबुक पेंड सर्कलचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, वाय. पी. नाईक, राहुल पाटील, प्रमोद शर्मा ही मंडळी बेळवट्टी गावातील प्राथमिक मराठी शाळेला भेट देण्यासाठी गेली होती.
बेळवट्टी मराठी शाळेची इमारत कोसळली होती. त्या शाळेची पाहणी करून येत असताना रस्त्यावरून धावण्याचा सराव करणारा प्रेम बुरुड संतोष दरेकर व त्यांच्या सहकारी मित्रांना दिसला. त्यांनी त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्याच परिसरात प्रेमचे वडील यल्लाप्पा बुरुड शेतात काम करीत होते. तेही त्या ठिकाणी आले. त्यांनी आपल्या मुलाबद्दल माहिती दिली व दै. तरुण भारतने प्रसिद्ध केलेली सोशल मिडीया व वृत्तपत्रामधील बातमी दाखविली.
या छोटय़ा बालकाची जिद्द पाहून संतोष दरेकर यांनी पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी डॉ. विक्रम आमटे यांच्याशी भेट करून दिली. डॉ. आमटे यांनी प्रेमला शाबसकी देऊन त्याला स्पोर्ट्स किट देऊन शुभेच्छा दिल्या. डॉ. देवस्त देसाई यांनीही प्रेमला स्पोर्ट्स शुज, स्पोर्ट्स टॅक व डाएट किट भेट स्वरुपात दिले.