बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी होणार चौकशी
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना सीबीआयने समन्स बजावले असून चौकशीसाठी हजर होण्याची सूचना दिली आहे. समन्सविषयी शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली असून 25 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर होणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादन प्रकरणी आपल्याला 19 नोव्हेंबर रोजी सीबीआयने समन्स पाठविले आहे. 23 रोजी चौकशीसाठी हजर होण्याची सूचना देण्यात आली आहे. तथापि, 23 रोजी हजर होणे शक्य नसल्याने आपण 25 रोजी चौकशीसाठी सीबीआयच्या कार्यालयात हजर राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी सीबीआय अधिकाऱयांनी 5 ऑक्टोबर रोजी शिवकुमार यांच्या बेंगळूरमधील सदाशिवनगर येथील निवासस्थानावर छापा टाकला होता. या कारवाईवेळी त्यांच्या निवासस्थानातून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकर खात्याने सीबीआयला केली होती.