वृत्तसंस्था/ रोम
स्वीडनचा पोल व्हॉल्टर आर्मंड डुप्लांटिसने युक्रेनचा महान खेळाडू सर्जी बुबकाचा 26 वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडित काढून आऊटडोअर पोल व्हॉल्टमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवला. येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत त्याने 6.15 मी. चा नवा विक्रम नोंदवला.
डुप्लांटिस हा विश्व इनडोअरचा (6.18 मी.) विक्रमधारक असून बुबकाने जुलै 1994 मध्ये इटलीत नोंदवलेल्या 6.14 मी.चा विश्वविक्रम त्याने मागे टाकला. स्वच्छ आणि वारारहित वातावरणात या स्पर्धेवर वर्चस्व राखत 20 वर्षीय डुप्लांटिसने दुसऱया प्रयत्नात हा विक्रम नोंदवला. ‘या यशानंतर मी अजूनही हवेतच असल्यासारखे वाटत आहे. स्वप्न साकार झाल्यानंतर मॅटवर खाली पडलो असलो तरी अजूनही मी त्याच अवस्थेत असल्याची भावना झाली आहे,’ असे तो म्हणाला.
गेल्या फेब्रुवारीत त्याने इनडोअरमध्ये विश्वविक्रम नोंदवला होता आणि ऑलिम्पिक व युरोपियन चॅम्पियनशिप्स कोरोना महामारीमुळे लांबणीवर टाकल्यानंतर आऊटडोअर विक्रम मोडणे हे त्याने ध्येय ठेवले होते. ‘हे यश मिळविण्याची माझी इच्छा होती. पण इनडोअर की आऊटडोअर याबाबत बराच गोंधळ मनात होता. आधी आऊटडोअरमध्ये यश मिळवून पाहुयात. मग गोंधळ आपोआपच नाहीसा होईल, असा मी तेव्हा विचार केला,’ असेही तो म्हणाला. त्याने एकंदर 15 व्या प्रयत्नात हे विक्रमी यश मिळविले आहे आणि यासाठी त्याने रोम हे योग्य ठिकाणच निवडले. कारण तेथील वातावरण विक्रमासाठी पोषक असल्याची त्याला जाणीव होती.