वृत्तसंस्था/ लॉसेन
शनिवारी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स संघटनेच्या वार्षिक सर्वोत्तम विश्व ऍथलीट्सच्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये स्वीडनचा पोलव्हॉल्टर अर्मांद डुप्लांटिसची पुरूष विभागात तर व्हेनेझुएलाची तिहेरी उडीतील ऍथलीट युलीमार रोजासची महिला विभागात सर्वोत्तम ऍथलीट्स म्हणून घोषणा करण्यात आली.
गेल्यावर्षी डोहा येथे झालेल्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत स्वीडनच्या डुप्लांटिसने पोल व्हॉल्ट या क्रीडाप्रकारात रौप्यपदक मिळविले होते. तसेच त्याने गेल्या फेब्रुवारीत झालेल्या पोलंडमधील तसेच पुरूषांच्या पोल व्हॉल्ट या क्रीडाप्रकारात 6.17 मी. विश्वविक्रम नोंदविला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये रोममध्ये झालेल्या डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेत डुप्लांटिसने 6.15 मी. चे अंतर नोंदवित पुरूषांच्या पोल व्हॉल्टमध्ये सुवर्णपदक मिळविले होते. स्वीडनच्या 21 वषींय डुप्लांटिसने 2020 च्या ऍथलेटिक्स हंगामातील सर्व म्हणजे 16 स्पर्धा जिंकल्या आहेत. पुरूष विभागातील 2020 च्या वर्षांत जगातील सर्वोत्तम ऍथलीट्सच्या शर्यतीमदये युगांडाचा चेपतेगेई, अमेरिकेचा प्रुसेर, जर्मनीचा व्हेटर आणि नॉर्वेचा वॉरहोम आणि स्वीडनचा डुप्लांटिस यांच्यात चुरस निर्माण झाली होती.
2020 च्या ऍथलेटिक हंगामातील महिलांच्या विभागात जगातील सर्वोत्तम महिला ऍथलीट म्हणून व्हेनेझुएलाची युलीमार रोजासची निवड करण्यात आली. फ्रान्समध्ये झालेल्या स्पधेंत रोजासने महिलांच्या तिहेरी उडीत 15.03 मीटरचे अंतर नोंदवित नवा दक्षिण अमेरिकन इनडोअर विक्रम नोंदविला. त्यानंतर तिने माद्रीद विश्व ऍथलेटिक्स इनडोअर स्पर्धेत 15.43 मीटरचे अंतर नोंदवित महिलांच्या इनडोअर तिहेरी उडीतील 16 वर्षे अबाधित राहिलेला विश्वविक्रम मागे टाकला. महिलांच्या विभागात सर्वोत्तम ऍथलीटच्या शर्यतीमध्ये रोजास, हॉलंडची सिफेन हॅसेन, इथोपियाची गिडे, केनियाची जेपचिरचिर आणि जमैकाची इलेनी थॉमसन यांच्यात चुरस होती.