ऑनलाईन टीम / मुंबई :
गुगलने आज प्रतिष्ठित भारतीय ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांच्या सन्मानार्थ त्यांच्या कार्याला सलाम केला आहे. डूडलच्या माध्यमातून गुगलने सेहगल यांच्या कामाची दखल घेतली आहे. या डूडलमध्ये जोहरा या त्यांच्या प्रसिद्ध डान्स पोजमध्ये दिसत आहेत. हे डूडल पार्वती पिल्लाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे.
अभिनेत्री आणि नृत्यांगना जोहरा सेहगल या जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या आणि ठसा उमटवणाऱ्या पहिल्या काही भारतीय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांच्या कार्याचा या माध्यमातून गौरव करण्यात येत आहे.
जोहरा सेहगल यांनी केलेल्या काही अविस्मरणीय भूमिकांमध्ये ‘निच्चा नगर’ चित्रपटातील भूमिकेचाही समावेश आहे. हा चित्रपट 1946 साली आजच्याच दिवशी कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला पहिला भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाला या फेस्टीव्हलमधील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच द पाल्म डीयोर पुरस्कार मिळाल होता.
जोहरा यांचा जन्म 27 एप्रिल 1912 रोजी सहारनपूरमध्ये झाला होता. त्यांनी जर्मनीमधील ड्रेसडेनमधील बॅलेट स्कूलमधून नृत्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर प्रख्यात नर्तक उदयशंकर यांच्यासमवेत आपली कारकीर्द 1935 मध्ये सुरू केली. सेहगल यांनी विविध नाटके, दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांसह त्यांनी बॉलीवूड व इंग्रजी चित्रपटांमध्येही चरित्र भूमिका केल्या होत्या.
‘ग्रॅण्ड ओल्ड लेडी’ या नावाने बॉलीवूडमध्ये परिचित असलेल्या जोहरा यांनी सन 2007 मध्ये शेवटची भूमिका रंगविली होती, संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटात. पद्मश्री पुरस्कार विजेत्या जोहरा यांना 2010 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘दिल से’, ‘चीनी कम’ आदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.
10 जुलै 2014 रोजी दिल्लीमध्ये जोहरा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या 102 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला.