दुबई / वृत्तसंस्था
न्यूझीलंडचा डॅरेल मिशेल आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराचा मानकरी ठरला. गतवर्षी अबुधाबीत टी-20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल त्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्या लढतीत मिशेलने अजाणतेपणाने गोलंदाज आदिल रशिदच्या मार्गात आल्यानंतर सहज होऊ शकणारी एकेरी धाव नाकारली होती. ही लढत दि. 10 नोव्हेंबर रोजी झाली होती.
आदिल रशिदच्या त्या डावातील 18 व्या षटकात जेम्स नीशमने चेंडू फटकावला आणि त्यानंतर एकेरी धाव होणे सहज शक्य होते. मात्र, नॉन स्ट्रायकर एण्डवरील मिशेलने ही धाव नाकारत आपल्या खिलाडूवृत्तीचा प्रत्यय आणून दिला होता.
डॅरेल मिशेल खिलाडूवृत्तीसाठी असणारा हा पुरस्कार जिंकणारा चौथा किवीज खेळाडू ठरला. यापूर्वी, डॅनिएल व्हेटोरी, ब्रेन्डॉन मेकॉलम व केन विल्यम्सन हे देखील या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आयसीसी खिलाडूवृत्तीचा पुरस्कार माझ्यासाठी विशेष सन्मानाचा आहे, असे मिशेल याप्रसंगी म्हणाला.
‘सामना जिंकणे हा आमच्यासाठीही प्राधान्यक्रम आहे. पण, यासाठी क्रिकेटची नीतिमूल्ये पायदळी तुडवणे आम्हाला मान्य नाही. आमच्यासाठी खिलाडूवृत्ती अधिक महत्त्वाची आहे आणि युवा पिढीसमोर या माध्यमातूनच उत्तम उदाहरण ठेवता येईल’, असे नीशम त्याप्रसंगी म्हणाला होता. मिशेलने त्या लढतीत 47 चेंडूत नाबाद 72 धावांचे योगदान साकारले. शिवाय, विजयी धाव देखील त्यानेच घेतली होती.