वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएलमधून निलंबित करण्यात आलेल्या डेक्कन चार्जर्सने बीसीसीआयविरुद्धची कोर्टातील लढाई जिंकली असून आयपीएलमधून काढून टाकल्याबद्दल या प्रँचायजीचे मालक डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्स लिमिटेड (डीसीएचएल) यांना 4800 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेश क्रीडा लवादाने बीसीसीआयला दिला आहे.
हैदराबादच्या या संघाला बीसीसीआयने निलंबित केले होते. पण ते बेकायदेशीर असल्याचे सांगून डीसीने लवादाकडे अपील दाखल केले होते. 2012 मध्ये डेक्कन चार्जर्सचे आयपीएलमधून निलंबन करण्यात आले होते. आयपीएलच्या सुरुवातीपासून हा संघ लीगमध्ये खेळत होता आणि दुसऱया आवृत्तीत त्यांनी जेतेपदही मिळविले होते. कंपनीच्या आर्थिक स्थितीवरून बीसीसीआयने या संघाचा करार रद्द केला होता. त्याविरुद्ध कंपनीने लवादाकडे आव्हान दिले होते. या प्रँचायजीने खेळाडूंचे मानधन थकवले होते आणि अनेक बँकांमधून कंपनीने घेतलेले 4000 कोटी रुपयांहून अधिक कर्जही थकवले होते. यामुळे त्यांचे निलंबन केल्याचे बीसीसीआयने म्हटले होते. उच्च न्यायालयाने डीसीला एकदा 100 कोटी रुपये बँक हमी देण्याचा आदेशही दिला होता. आता आठ वर्षांनंतर लवादाने डेक्कन चार्जर्सच्या बाजूने निकाल दिला असल्याने बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसला आहे.