नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असला तरी वेगवेगळय़ा आरोग्य सुविधांचा पुरवठा करणे आणि रुग्णांच्या प्रकृतीनुसार त्यांच्यावर योग्य औषधोपचार करण्यातही सरकारने आघाडी घेतली आहे. कोरोना विषाणूमुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. या औषधामुळे रुग्णांची प्रकृती सुधारू शकते असा दावा सध्या केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या औषधाच्या वापराला सकारात्मकता दर्शवली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या उपचार पद्धतीमध्ये काही सुधारणा सुचवल्या आहेत. त्यानुसार मेथाइलप्रेडिनसोलोनला पर्याय म्हणून ‘डेक्सामेथासोन’चा वापर करण्यास अनुमती देण्यात आली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरले जाऊ शकते.
‘डेक्सामेथासोन’ हे जेनेरिक स्टेरॉईड प्रकारातील औषध आहे. ते प्रामुख्याने संधीवात, अ?Ÿलर्जी, दमा आणि कर्करोगावरील उपचारासाठी वापरले जात होते. आता हे औषध कोरोनावर सुद्धा प्रभावी ठरत आहे. कोरोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्याची सूचना करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये ‘डेक्सामेथासोन’ औषध कोरोनावर प्रभावी ठरले होते. ‘डेक्सामेथासोन’चा डोस कमी प्रमाणात देऊन गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना वाचविण्यातही यश आलेले आहे. साहजिकच या औषधामुळे मृत्यूदर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.