वृत्तसंस्था/ हर्निंग
2022 च्या फिफाच्या विश्व़ करंडक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी सध्या सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेतील रविवारी येथे फ गटातील झालेल्या सामन्यात डेन्मार्कने मॉल्डोव्हाचा 8-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
डेन्मार्कतर्फे या सामन्यात कास्पर डोलबर्ग आणि मिकेल डेम्सगार्ड यांनी प्रत्येकी दोन गोल केले. पात्र फेरीच्या यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात डेन्मार्कने इस्त्रायलचा 2-0 असा पराभव करून पूर्ण गुण वसूल केले होते. रविवारच्या सामन्यात 19 व्या मिनिटाला डेन्मार्कचे खाते डोलबर्गने उघडले. 22 व्या मिनिटाला डेन्मार्कचा दुसरा गोल डेम्सगार्डने केला. 24 व्या मिनिटाला डेम्सगार्डने डेन्मार्कचा तिसरा गोल केला. लार्सनने डेन्मार्कचा चौथा तर जेनसनने डेन्मार्कचा पाचवा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत डेन्मार्कने मॉल्डोव्हावर 5-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्यांच्या उत्तरार्धात डेन्मार्कचे तीन गोल स्कोव्ह आणि इंगव्हेस्टनने केले. या गटात आता डेन्मार्कचा संघ सहा गुणांसह पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रीया 4 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे.