बल्गेरियाच्या ‘फेब्रुवारी’ चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार,,‘द सायलेन्ट फॉरेस्ट’ चित्रपटाचे चॅन नियन को सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक,‘इंडियन पर्सोनालिटी ऑफ द इयर’ने अभिनेता विश्वजित चटर्जी सन्मानित ‘आय नेव्हर क्राय’ ची झोफिया स्टाफिएज उत्कृष्ट अभिनेत्री
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात आयोजित 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल रविवारी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमवर शानदार समारोप करण्यात आला. डेन्मार्कचा चित्रपट ‘इन्टू द डार्कनेस’ला उत्कृष्ट चित्रपटाचा अव्वल मान प्राप्त झाला. सुवर्णमयुर व रोख 40 लाख रुपयांचे बक्षीस या चित्रपटाला प्राप्त झाले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ‘द सायलेन्ट फॉरेस्ट’ या तैवानी चित्रपटाचे चॅन नियन को यांची निवड करण्यात आली तर याच चित्रपटातील त्झू चौन लिऊ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार देण्यात आला. ‘आय नेव्हर क्राय’ चित्रपटातील झोफिया स्टाफिएज यांना उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार देण्यात झाला. आयसीएफटी गांधी युनेस्को पुरस्कार ‘200 मीटर’ या इज्रायली चित्रपटास प्राप्त झाला.
‘इंडियन पर्सोनालिटी ऑफ द इयर’ म्हणून प्रसिद्ध अभिनेता विश्वजित चटर्जी तसेच सुमारे 650 चित्रपटात काम करणारे अभिनेते तथा विद्यमान खासदार रवी किशन यांना सन्मानित करण्यात आले.
दि. 16 जानेवारीपासून सुरू असलेल्या 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. चित्रपट सृष्टीतील बडे निर्माते सत्यजित रे यांना समर्पित या महोत्सवातून सुमारे 60 देशातील चित्रपट दाखविण्यात आले. त्यासाठी 11 देशातील 39 मान्यवरांनी उपस्थिती लावली. कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असतानाही अत्यंत कल्पकतेने आणि शिस्तबद्दरित्या आयोजित करण्यात आलेला हा चित्रपट महोत्सव पूर्णपणे यशस्वी झाल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अमित खरे यांनी सांगितले. 52वा चित्रपट महोत्सव नियोजित वेळापत्रकानुसार याच वर्षी होईल, असेही ते म्हणाले.
‘व्हेलेंटिना’ ठरला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट
पदापर्णातील उत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘व्हेलेंटिना’ या पोर्तुगीज चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला. ‘फेब्रुवारी’ चित्रपटाचे दिग्दर्शक कामिन कालेव यांना विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला. विशेष मानांकनामध्ये ‘ब्रिज’ या चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला.
समारोप सोहळ्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माहिती प्रसारण सचिव अमित खरे, केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, खासदार तथा अभिनेते रवी किशन, सन्माननीय पाहुणी प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान, राहूल रवेल, मंजू व्होरा, रवी कोटारकर, प्रियदर्शन, तसेच गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय, ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा, आदींची उपस्थिती होती.
अमिताभ बच्चनने दिला संदेश
भारत आणि बांगलादेशच्या मैत्रीची 50 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे यंदाच्या आंचिममध्ये बांगलादेशातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. सोहळ्यात प्रारंभी भारतीय चित्रपटांच्या गत 70 वर्षातील संगीतमय प्रवासावर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला. अमिताभ बच्चन यांचा संदेश दाखविण्यात आला.
अमित सतिजा यांनी बोलताना प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम सहज शक्य असते आणि त्यात हमखास यश मिळते, त्याचा पुरावा म्हणजे यंदाचे आंचिमचे यशस्वी आयोजन आहे, असे प्रतिपादन अमित सतिजा यांनी केले.
भारत बांगलादेश मैत्री उत्तरोत्तर वाढावी : कोश्यारी
भारत बांगलादेश यांच्यातील मैत्रीच्या 50 वर्षानिमित्त यंदा आंचिममध्ये खास दखल घेण्यात आली आहे. त्यात पुढील 10 वर्षांत उत्तरोत्तर वृद्धी होत जाऊन ’दोन देश एक आत्मा’ असे चित्र दिसावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. कोरोना संकटकाळातही अत्यंत साहस दाखवत आंचिमचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी केंद्र आणि गोवा सरकारचे अभिनंदन केले. हिंदी ही आमची राष्ट्रभाषा असली तरी आता ती विश्वभाषा बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आमच्या शेजारील बांगलादेश, नेपाळ, यासारखे अनेक देश दैनंदिन जीवनात हिंदीचा वापर करू लागले आहेत. याकामी हिंदी चित्रपटसृष्टीचे महत्वपूर्ण योगदान आहे. चित्रपटांच्या माध्यमातूनच ते हिंदी शिकत आहेत, समजत आहेत, असे कोश्यारी म्हणाले.
देशविदेशातील निर्मात्यांनी गोव्यात यावे : मुख्यमंत्री
कोरोना संकटकाळात अनेक अडथळे असतानाही येथील कलाकार डगमगले नाहीत. त्यांच्यामुळेच नऊ दिवसांचा हा शानदार सोहळा संस्मरणीय बनला. त्यातून अमर्याद सृजनशिलता आणि कल्पनेचा आविष्कार पाहण्यास मिळाला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा हा केवळ सन, सँड अँड सी एवढय़ापुरताच मर्यादित नाही. इतरही अनेक सुंदर व प्रेक्षणीय स्थळे येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आंचिमसारख्या महोत्सवांच्या आयोजनाद्वारे पर्यटनाला नवा आयाम देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. या तमाम पर्यटन स्थळांच्या बरोबरीनेच आम्ही आता इको पर्यटनालाही प्रोत्साहन देणार आहोत. त्याद्वारे वेगवेगळ्या मोसमात गोव्यात येणाऱया पर्यटकांना येथील आंतरिक सौंदर्य पाहता येणार आहे. त्याचबरोबर गोव्याच्या निरंतर विकासासाठी निर्धारित ध्येय ठेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्याचाच भाग म्हणून पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे, त्यासाठी सर्वांना निमंत्रित करत आहे, असे सांगून या महोत्सवाच्या दरम्यान गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्याची संधी सर्वांना मिळेल, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
भारतासह जगभरातील चित्रपट निर्मात्यांनी गोव्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. गोवा हे शुटिंगसाठी उत्कृष्ट स्थळ व्हावे, चित्रपटांचे केंद्र बनावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करमणूक संस्थेच्या माध्यमातून गोवा सरकार करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पुढील आंचिम यापेक्षाही अधिक सुंदर बनविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.
सर्व सन्माननीय मान्यवर तसेच पुरस्कारप्राप्त चित्रपट आणि त्यांचे संबंधित कलाकार, दिग्दर्शक यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी वावरलेले सर्व कर्मचारी, तसेच अधिकारीवर्गाला त्यांनी धन्यवाद दिले.
अनेक मान्यवरांचा सन्मान
‘इंडियन पर्सोनालिटी ऑफ द इयर’ म्हणून प्रसिद्ध अभिनेता विश्वजित चटर्जी तसेच सुमारे 650 चित्रपटात काम करणारे अभिनेते तथा विद्यमान खासदार रवी किशन यांच्यासह महोत्सवाच्या आयोजनात तांत्रिकदृष्टय़ा महत्वपूर्ण योगदान देणाऱया तंत्रज्ञांनाही सन्मानित करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, रवी किशन, विश्वजित चटर्जी, अभिनेत्री झीनत अमान, यांनीही विचार मांडले. समारोप सोहळय़ाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सिमोन सिंग यांनी केले.
आंचिम परिसर आज, उद्या सर्वसामान्यांसाठी खुले
दरम्यान, आंचिम निमित्त सजविण्यात आलेले ईएसजी, कला अकादमी आणि अन्य परिसर सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. आंचिमच्या समारोपानंतर आज दि. 25 व उद्या दि. 26 रोजी वरील सर्व परिसर विद्यार्थी व अन्य नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. दोन्ही दिवशी सकाळी 10 ते रात्री 11 पर्यंत ते खुले असतील, अशी माहिती ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली. सर्वांनी तेथे भेट देऊन मनमोहक सजावट व नेत्रदिपक रोषणाईचा आस्वाद घ्यावा, असेही ते म्हणाले.
- सुवर्णमयुर : इन टू द डार्कनेस (डेन्मार्क)
- उत्कृष्ट दिग्दर्शक : चॅन नियन को (तैवान – द सायलेंट फॉरेस्ट)
- विशेष ज्युरी पुरस्कार : कामिन कालेव (चित्रपट – फेब्रुवारी)
- पर्दापणातील उत्कृष्ट दिग्दर्शक : कासिओ परेरा सान्तोस (चित्रपट – व्हेलेंटिना)
- विशेष मानांकन : क्रिपाल कलिता (’ब्रिज’ भारतीय चित्रपट)
- उत्कृष्ट अभिनेता : त्झू चौन लिऊ (चित्रपट – द सायलेंट फॉरेस्ट)
- उत्कृष्ट अभिनेत्री : झोफिया स्टाफिएज (चित्रपट – ‘आय नेव्हर क्राय’)
- आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कार : अमिन नायफे (चित्रपट – ‘200 मीटर’)