वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डेन्मार्कमधील ओडेन्स येथे 13 ऑक्टोबरपासून खेळविल्या जाणाऱया डेन्मार्क खुल्या सुपर आंतरराष्ट्रीय 750 बॅडमिंटन स्पर्धेतून भारताचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. कश्यप यांनी माघार घेतल्याची माहिती अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनने दिली आहे.
कोरोना महामारी संकटामुळे 2020 च्या हंगामातील पूर्ण विस्कळीत झालेले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन वेळापत्रकाला पुन्हा 13 ऑक्टोबरपासून फेरसुरूवात केली जाणार आहे. लंडनमध्ये अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्यानंतर मार्च महिन्यांत कोरोना महामारीला प्रारंभ झाला. त्यानंतरच्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या टूरवरील सर्व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोरोनामुळे घेता आल्या नाहीत. येत्या जानेवारी महिन्यात सुरू होणाऱया आशिया टूरवरील स्पर्धेपासून आपल्या बॅडमिंटन हंगामाला प्रारंभ करणार असल्याचे लंडन ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक मिळविणाऱया सायना नेहवालने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. डेन्मार्कमध्ये होणाऱया 750,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी सायना नेहवाल आणि तिचा पती पी. कश्यप आणि आपल्या प्रवेश पत्रिका गेल्या महिन्यात स्पर्धा आयोजिकाकडे पाठविल्या होत्या.
कोरोना महामारीमुळे विश्व बॅडमिंटन फेडरेशनने थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन अंतिम स्पर्धा 3 ते 11 ऑक्टोंबर दरम्यान लांबणीवर टाकली होती. त्याचप्रमाणे आशियामध्ये होणाऱया तीन स्पर्धा 2021 सालापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणारी डेन्मार्क मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. विश्व बॅडमिंटन फेडरेशनने डेन्मार्कमध्ये तीन स्पर्धा पाठोपाठ घेण्याची योजना आखली असून त्यामध्ये थॉमस-उबेर चषक अंतिम स्पर्धा, डेन्मार्क खुली आणि डेन्मार्क मास्टर्स स्पर्धाचा समावेश आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतातर्फे के. श्रीकांत, लक्ष्य सेन, अजय जयराम, शुभंकर डे हे सहभागी होणार आहेत.